आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Shankhnad Rally, BJP, Divya Marathi

होम मैदानावर घुमला मोदींचा शंखनाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागातून लाखाहून अधिक चाहत्यांनी होम मैदानावर उपस्थिती दर्शवली. यात प्रामुख्याने तरुण आणि शेतक-यांची संख्या लक्षणीय होती. 3.30 वाजता मोदी येणार असल्याने दुपारी एक वाजल्यापासूनच सभास्थानी नागरिक जमा होत होते. पावणेचार वाजेपर्यंत ती संख्या लाखाच्या पुढे गेली. खचाखच भरलेल्या होम मैदानावर मोदी... मोदी... आणि ‘अब की बार मोदी सरकार’ अशा घोषणा देण्यात आल्या.
महायुतीचे सोलापूर मतदार संघातील उमेदवार अ‍ॅड. शरद बनसोडे आणि माढा मतदार संघातील सदाभाऊ खोत यांच्यासाठी मोदींची प्रचारसभा होती. दुपारी एकपासूनच मार्केट पोलिस चौकी आणि सिद्धेश्वर मंदिरासमोरील बाजूने प्रवेश देण्यात येत होेते. दुपारी 2.25 वाजता स्थानिक नेत्यांनी भाषणास सुरुवात केली. सभा सुरू होताच हळूहळू गर्दी वाढत गेली. मोदी यांचे 3.35 वाजता व्यासपीठावर आगमन झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या 4 मिनिटांच्या भाषणानंतर 3.45 वाजता मोदी बोलण्यास उभे राहिले. लोकांचा लोंढा होम मैदानाकडे येतच होता.
मुस्लिम महिलांची मोठी उपस्थिती : मोदी यांच्या सभेला मुस्लिम समाजातील महिलांची मोठी उपस्थिती होती. सुमारे दोन हजार महिलांचा सहभाग होता. मैदानावर भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, रासप आणि तेलगू देसम पार्टीचे झेंडे लावले होते. मैदानाच्या मधोमध मागील लोकांना सभा पाहता यावी म्हणून दोन मोठे एलईडी लावण्यात आले होते.
फेसबुक, व्हाट्स अ‍ॅपवर धूम : मोदींची सभा सुरू होताच अनेक तरुणांनी आपापल्या स्मार्ट फोनमध्ये मोदींना कैद केले. अनेकांनी मोदी यांचे संपूर्ण भाषण रेकॉर्ड करून घेतले. सभा संपताच मोदींचे भाषण, अभूतपूर्व गर्दीचा फोटो, मोदींच्या छबी फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर लोड केले.
मोदींच्या लाटेनंतर वादळ : सभेच्या शेवटी वातावरणात अचानक बदल झाला. वादळ आल्याने धुळीचा लोट उठले. आकाशात अचानक ढग आले. त्यामुळे सूर्य झाकोळला जाऊन उन्हाच्या त्रासापासून सुटका झाली.
जत्रेचे रूप अन् पाऊंचचा खच : सभास्थानाला जत्रेचे स्वरूप आल्याने बाहेरील बाजूस काकड्या आणि खाद्यपदार्थ विक्री होताना दिसले. मैदानाच्या बाहेरील बाजूला पाण्याचे पाऊंच उपलब्ध करून देण्यात आले होते. नंतर रिकाम्या पाऊंचचा खच पडलेला आढळून आला.
कोण काय म्हणाले...
देवेंद्र फडणवीस : रणजी खेळणा-यांनी (मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी) टी 20 खेळणा-यांबरोबर चर्चा करण्याची भाषा करू नये. त्यांनी अगोदर आमच्याशी बोलावे. राष्‍ट्रवादी काँग्रेस सध्या ‘इनोव्हा’ पार्टी आहे, ती निवडणुकीनंतर ‘नॅनो’ पार्टी होईल.
नीलम गो-हे : सेना-भाजप सरकार केंद्रात होते तेव्हा अनेक चांगली कामे केली आहेत.
शरद बनसोडे : नरेंद्र मोदी नावाचे वादळ आले आहे. त्यात काँग्रेसचे उमेदवार उडून जातील.
सदाभाऊ खोत : माढा मतदार संघात धनदांडग्यांविरुद्ध माझी लढाई आहे. माढ्यात अनेक मंत्री तळ ठोकून आहेत.
आमदार विजयकुमार देशमुख : सुशीलकुमार शिंदे 40 वर्षांपासून सत्तेत आहेत. त्यांनी शहरात रोजगार दिला नाही.
आमदार सिद्रामप्पा पाटील : देशात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. ते नष्ट करण्यासाठी केंद्रात भाजपचे नरेंद्र मोदी सरकार येणे गरजचे आहे.
पोलिसांचा होता नियोजनबद्ध बंदोबस्त
नरेंद्र मोदींची जाहीर सभा सोलापुरात होणार असल्यामुळे स्थानिक पोलिसांसह, गुजरातचे पोलिस महासंचालक, दिल्लीचे सुरक्षा पथक बंदोबस्त नियोजनात होते. बुधवारी मोदींची सभा यशस्वी पार पडली. नियोजनबद्ध बंदोबस्तामुळे पोलिसांची कसोटी यशस्वी ठरली.
होटगी रस्ता ते सातरस्ता, जुना एम्प्लॉयमेंट चौक ते डफरीन चौक हा मार्गही मोदींचा ताफा येण्याआधी बंद होता. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर केल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची समस्या कमी दिसली. दुपारी एकच्या सुमाराला होम मैदानाकडे जाणारे मार्ग बंद केले होते. भगिनी समाज, पंचकट्टा, प्रशासकीय मध्यवर्ती इमारत या तीन ठिकाणांहून नागरिकांना आत सोडण्यात येत होते. वाहनांना पार्किंग नेमून दिल्यामुळे होम मैदानजवळ वाहनांची गर्दी झाली नाही. तीन दिवसांपासून पोलिस नियोजन करत होते. मोदींची सभा संपल्यानंतर विमानाने टेकआॅफ घेतल्यानंतर सर्वांनीच निश्वास सोडला.
30 मिनिटांच्या भाषणात 45 वेळा ‘भाईयों और बहनों’
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची भाषण करण्याची स्वत:ची अशी वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे. ते वारंवार ‘भाईयों और बहनों’ ही शब्दावली उच्चारतात. बुधवारी होम मैदानावर मोदी यांचे मोजून 30 मिनिटांचे भाषण झाले. त्यांनी तब्बल 45 वेळा ‘भाईयों और बहनों’चा उच्चार करत उपस्थितांना आपलेसे केले. मोदी यांचे चाहते सभेप्रसंगी ‘नमो नमो’चा नारा करत असले तरी मोदी मात्र ‘भारत माता की जय’चा नारा बुलंद करतात. होम मैदानवरील सभेची सुरुवात आणि शेवट त्यांनी भारतमातेच्या जयजयकाराने केला. आगामी काळातील 60 महिन्यांचे सरकार कसे असेल याचे चित्र उभे करण्याची त्यांची अनोखी शैली आहे. भाषणात विकासाच्या मुद्द्यावर भर असतो. सत्ताधारी काँग्रेसवर टीका करताना मॅडम आणि शहजादे हे शब्द हमखास वापरतात.