आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक चव्हाण यांना चौकीदार करणार का? सोलापूरच्या सभेत नरेंद्र मोदींचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर/लातूर - कारगिल युद्धातील शहिदांच्या विधवांसाठी असलेल्या आदर्श सोसायटीत घोटाळा करणार्‍या अशोक चव्हाण यांना चौकीदार करणार काय, असा परखड सवाल करून हे तर दुधाची राखण करण्यासाठी मांजराची नेमणूक करण्यासारखेच होईल, अशा शब्दांत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी घणाघाती हल्ला चढवला. सोलापूर आणि लातूर येथे बुधवारी झालेल्या सभांमध्ये गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, कृषिमंत्री शरद पवारांनाही मोदींनी लक्ष्य केले.
महायुतीचे सोलापूरचे उमेदवार शरद बनसोडे, तर लातूरचे सुनील गायकवाड यांच्या प्रचारार्थ मोदी यांच्या सभा झाल्या. खासदार गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, संभाजी पाटील निलंगेकर आदी या वेळी उपस्थित होते. लातुरातील सभेला जवळपास लाखभर लोक उपस्थित होते. क्रीडा संकुलाचे मैदान खचाखच भरले होते. त्यामुळे अनेकांना बाहेर रस्त्यावर उभे राहून मोदींना ऐकावे लागले. सभेला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. महिलांची संख्या मात्र कमी होती.
शेतकर्‍यांना मदतीत आखडता हात
गारपीट झाल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण त्यांना मदत देण्यात आखडता हात घेण्यात आला. नैसर्गिक संकटात शेतकर्‍यांना फक्त सरकारच वाचवू शकते; पण राज्य व केंद्र सरकारनेही हे दायित्व दाखवले नसल्याचा आरोप मोदींनी केला.
कल्पना गिरी हत्येचा उल्लेख : काँग्रेस कार्यकर्ती कल्पना गिरी खून प्रकरणाचा संदर्भ देत मोदी म्हणाले, कल्पनाचे आईवडील न्यायासाठी दारोदार फिरत आहेत; परंतु त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे. सोनिया गांधी आणखी किती कल्पनांचा बळी जायची वाट पाहत आहेत, असा सवालही मोदींनी केला.
मोदींचा हल्लाबोल
शिंदे ‘कमाल के आयटम’, सोनियांची आरती करतात
गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ‘कमाल के आयटम’ आहेत. बॉम्बस्फोट झाला तरी ते हसतच बोलतात. शिंदे यांना नेहमीच प्रमोशन मिळते. विकास करो वा न करो हे चालतच राहते. कारण ते सोनिया परिवाराची ‘आरती’ करतात, त्यांचा ‘प्रसाद’ देतात. लोकांची नाही पण गांधी परिवाराची त्यांना पर्वा आहे. आता तरुण जागृत झाले आहेत. ही नवी पिढी आता शिंदे यांना आराम करायला लावील.
पवारांना भूकंपग्रस्त लातूर पुन्हा उभारता आले नाही
अलीकडे शरदराव माझी सकाळ-संध्याकाळ आठवण काढत आहेत. त्यामुळे मी त्यांची लातुरात आठवण काढणार आहे. पवार 10 वर्षांपासून केंद्रात कृषिमंत्री आहेत; परंतु कोणतेच प्रभावी कार्य केले नाही. लातुरात भूकंप झाला. कित्येक वर्षे त्याची उभारणीही त्यांना करता आली नाही; गुजरातमध्ये भूकंपानंतर तीन वर्षांत जीवनमान उभे केले.
गृहमंत्री आर. आर. पाटील, अजित पवारदेखील टार्गेट
गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणजे डबल आर. पाटील आहेत. उजनीच्या पाण्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलले. मतदानाला जाताना ही भाषा लक्षात ठेवा. त्यांना तुमची ताकद दाखवून द्या, अन्यथा ते दुसर्‍यांनाही बिघडवतील.