आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रध्वज सन्मान अभियानातील सहभागासाठी सरसावल्या शाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दैनिक ‘दिव्य मराठी’च्या राष्ट्रध्वज सन्मान अभियानास शहरातील शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक शाळांनी राष्ट्रध्वज सन्मान अभियानात सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी (दि. 24 व 25 जानेवारी) या शाळा विद्यार्थ्यांना तिरंग्याचा सन्मान राखण्याची शपथ देणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये या अभियानामुळे राष्ट्रभक्ती वृद्धिंगत होईल, अशी अपेक्षा मुख्याध्यापकांनी व्यक्त केली आहे.

शुक्रवारी आणि शनिवारी आपल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाच्या सन्मानाची शपथ देण्याची तयारी दर्शवून आज अनेक शाळा ‘दिव्य मराठी’ राष्ट्रध्वज सन्मान अभियानात सहभागी झाल्या. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मोठय़ा प्रमाणावर प्लास्टिक आणि कागदाच्या राष्ट्रध्वजांची विक्री होते. यानंतर मात्र राष्ट्राच्या सन्मानाचे प्रतीक असणारा आणि देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवणार्‍या तिरंग्याकडे दुर्लक्ष केले जाते. हा अपमान टाळण्यासाठी आणि राष्ट्रध्वज जमिनीवर पडू नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या ज्ञानदानाचे मुख्य केंद्र असलेल्या शाळांनी आता राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा
अलीकडे लहान आकारातील प्रतीकात्मक राष्ट्रध्वज कागदी, प्लास्टिक स्वरूपात 15 ऑगस्ट व 26 जानेवारीच्या निमित्ताने सर्वत्र दिसून येतात. तिरंग्याचा अवमान तर होत नाही ना, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे दैनिक ‘दिव्य मराठी’च्या राष्ट्रध्वज सन्मान अभियानात सहभागी होऊन प्रत्येक विद्यार्थ्याने तशी शपथच घ्यावी. जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना प्रार्थनेच्यावेळी शपथ घ्यावी, असे परिपत्रक काढण्यात आले आहे. जगन्नाथ शिवशरण, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

देशभक्तीची भावना निर्माण व्हावी
या अभियानाच्या माध्यमातून देशप्रेमाची भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेत ही शपथ द्यावी. ही शपथ मुख्याध्यापक संघाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे.’’ सुभाष माने, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ

राष्ट्रधर्म पाळला पाहिजे
राष्ट्रध्वज अंकित असलेली कुठलीही वस्तू सन्मानाने जपावी. लहान आकारातील खिशाला लावण्यात येणारे राष्ट्रध्वज इकडे-तिकडे पडणार नाहीत याची काळजी विद्यार्थ्यांसह पालकांनीही घ्यावी. विद्यार्थीच नव्हे, तर अनेकदा मोठय़ा व्यक्तींकडूनही राष्ट्रध्वजाचा कळत-नकळत अवमान होतो हे टाळले पाहिजे. राष्ट्रध्वज आपली आन, बान आणि शान आहे. त्याचा अवमान होता कामा नये. आपण आपला धर्म जसा पाळतो, तशाच पध्दतीने राष्ट्रधर्मही पाळवा.’’ डॉ. एन. एन. मालदार, कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ

अभियानामधील सहभागी शाळा
डॉ. आंबेडकर मेमोरिअल हायस्कूल, एसव्हीसीएस हायस्कूल, वारोनोको प्रशाला, कुचन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, संभाजीराव शिंदे प्रशाला, बी. एफ. दमाणी प्रशाला, दयानंद काशिनाथ आसावा, स. हि. ने. प्रशाला,र्शाविका प्रशाला, इंडियन मॉडेल स्कूल, सेवासदन प्रशाला, रावजी सखाराम प्रशाला, नू. म. वि. प्रशाला, जुळे सोलापूर