आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress Party News In Marathi, Madha Lok Sabha Seat, Mohite

विश्‍लेषण: घड्याळाच्या वाटेत अडथळ्यांचे काटे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघात प्रतापसिंह मोहिते यांची बंडखोरी, फलटण तालुक्यातील नेत्यांची कुरघोडी आणि माढा तालुका विकास आघाडीतील नेत्यांची शिरजोरी यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते यांच्या वाटेतील अडथळ्यांचे काटे वाढू लागले आहेत. 29 मार्च हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर प्रचाराचा धुराळा उडेल. तत्पूर्वीच या सर्व अडथळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मोहितेंना पर्शिम घ्यावे लागणार आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असूनही उमेदवारी जाहीर झाल्यापासून विजयसिंह आणि रणजितसिंह मोहिते यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनधरणीसाठी फिरावे लागले. हे कमी म्हणून की काय त्यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले. फलटणचे काँग्रेस नेते रणजितसिंह निंबाळकर यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले. प्रतापसिंहांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी त्यांच्या कन्येच्या विवाहाला विजयसिंह किंवा त्यांचे कुटुंबीय उपस्थित नव्हते. गतवर्षी वेळापूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी मोहिते कुटुंबीयांनी एकत्र येऊन धवलसिंह मोहिते यांना निवडून आणले. पण अवघ्या सहा महिन्यांत कुटुंबातील मतभेद समोर आले. आता प्रतापसिंह माघारीच्या मनस्थितीत नाहीत. त्यांच्या उमेदवारीमुळे माळशिरस, करमाळा, माढा तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विचलित होऊ शकतात.


फलटणकरांचे दुखणेच वेगळे
फलटणमधील काँग्रेस नेत्यांचा राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप आहे. दोन महिन्यांपूर्वी या नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. तसेच त्यांनी विजयसिंह उमेदवार असतील तर मदत करू, असेही त्यांनी शरद पवारांना सांगितल्याची चर्चा होती. आता विजयसिंह व रामराजे यांच्या एकत्र सभा होत आहेत. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. आता त्यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडूनच शब्द हवा आहे. चव्हाण यांनीही याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे या काँग्रेस नेत्यांनी 29 मार्चनंतर राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा विचार करू, असे सांगितले आहे.

एकीचा असाही परिणाम
माढा तालुका विकास आघाडीला विजयसिंहांनी बळ दिल्याची चर्चा होती.त्यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आघाडीतील बरीच मंडळी अकलूूजमध्ये जाऊन ‘दादा तुम्ही उभे राहा, आम्ही निवडून देऊ’, असे म्हणत होते. तेच आता अटी घालत आहेत. विजयसिंह आणि आमदार बबनराव शिंदे यांच्या एकत्रित सभांमुळे अनेकांना आपले भवितव्य अंधारात जाण्याची भीती आहे.

‘पृथ्वी’ अस्त्राकडे लक्ष
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विजयसिंह मोहिते यांचे सलोख्याचे संबंध आहेत. गेल्या दोन वर्षांत पवारांवर कुरघोडी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना मोहितेंनी मदत केल्याची चर्चा होती. फलटणचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले तरच ऐकू, असे सांगत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण केव्हा निर्णय घेणार, याकडेही लक्ष आहे.