Home »Maharashtra »Western Maharashtra »Solapur» Nationalist Congress Party Workers Burn Statue Of Raj Thackeray

पवारांवर टीका करण्‍याची पात्रता राज ठाकरेंकडे आहे का? राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचा सवाल

प्रतिनिधी | Feb 24, 2013, 12:58 PM IST

सोलापूर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी सोलापुरातील नॉर्थकोट मैदानावर केलेल्या जाहीर भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह व खालच्या थराला जाऊन वक्तव्य केल्याबद्दल ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी पोलिस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली. तसेच सदर बझार पोलिस ठाण्यात ठाकरे यांच्या भाषणाची सीडी व निवेदन देण्यात आले. राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांच्‍यावरही राज ठाकरेंनी टीका केली होती. शरद पवारांवर टीका करण्‍याची पात्रता राज ठाकरेंकडे आहे का, असा सवाल राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे.

अन्यथा आंदोलन करणार
दोन दिवसांत पोलिसांनी ठाकरे यांच्यावर कारवाई न केल्यास संपूर्ण जिल्हाभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले. ठाकरेंवर कलम 504, 501-1 सी-499 या अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

चार पुतळा चौकात दुपारी प्रतीकात्मक पुतळा दहन
दरम्यान, शनिवारी दुपारी एकच्या सुमाराला चार पुतळा चौकात राज ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर फौजदार चावडी पोलिसांनी संतोष पवार यांच्यासह तीसजणांना अटक करून पोलिस ठाण्यात आणले. पुतळा दहन केल्याप्रकरणी सर्वांवर गुन्हा दाखल करून त्यांना जामिनावर सोडण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रकांत शिंदे यांनी दिली.

पोलिस आयुक्तांना निवेदन
पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांना भेटून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात संतोष पवार, संजय पाटील, गणेश पाटील, भारत बेंद्रे, जितेंद्र साठे, बिपीन करजोळे यांच्यासह सुमारे शंभर कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

राज ठाकरे यांना निरोप
गुरुवारी रात्री सोलापुरात आलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सोलापुरातून उस्मानाबादकडे रवाना झाले. दोन्ही दिवस त्यांचा मुक्काम सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात होता. सकाळी तेथून ते नाष्ट्यासाठी युवराज चुंबळकर यांच्याकडे (भागवत थिएटर समोर) आले, तेथून पांजरापोळ चौक मार्गे ते उस्मानाबादकडे रवाना झाले. ते रवाना होताच सोलापुरात शुक्रवारच्या त्यांच्या भाषणाचे राजकीय पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी दुपारी आंदोलनही केले. त्यांचे भाषण राज्यभर चर्चेत राहीले.


माहिती घेत आहोत
भाषणाची सीडी व्हेरीफाय होणार आहे. विधी अधिकार्‍यांचा सल्ला घेतल्यानंतर गुन्हा दाखल होत असेल तर कारवाई करणार. कोणत्या पद्धतीने कारवाई करता येईल याची माहिती घेत आहोत.’’ प्रदीप रासकर, पोलिस आयुक्त

आमच्या भावना दुखावल्या
ठाकरे यांच्या भाषणाबद्दल आमचे काही म्हणणे नाही. लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. पण, त्यांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यावर खालच्या थराला जाऊन वक्तव्य केले. याने पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. दोन दिवसांत कारवाई करावी. अन्यथा आम्ही आंदोलन छेडणार आहे.’’ संतोष पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, जिल्हाध्यक्ष

दोन दिवसांत निर्णय होईल
राष्ट्रवादी पक्षातर्फे सदर बझार पोलिसांना ठाकरे यांच्या वक्तव्याबद्दल निवेदन व सीडीही दिली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. याबाबत गुन्हा दाखल करता येतो का याची विधी सल्लागार यांच्याकडे माहिती घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. दोन दिवसांत याबाबत निर्णय होईल.’’ रवींद्र थोरात, साहाय्यक पोलिस निरीक्षक, सदर बझार पोलिस स्टेशन

Next Article

Recommended