आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी सोलापूर-मुंबई एक्स्प्रेस रात्री धावणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर-मुंबई एक्स्प्रेस या गाडीची वेळ अद्याप ठरली नसली, तरीही ती रात्रीच धावेल, असे स्पष्ट संकेत मध्य रेल्वेचे प्रभारी सरव्यवस्थापक बी. पी. खरे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिले आहे.
नव्या गाड्यांसाठी चेअरकारचे दोन रेक (डबे) मंजूर झाले आहेत. सोलापूरकरांची व राजकीय नेत्यांची मागणी लक्षात घेता नवी गाडी रात्रीच धावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रात्री साडेआठ ते साडेनऊ च्या दरम्यान धावणार असल्याचे रेल्वे सूत्रांकडून समजते. सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या अगोदर ही गाडी निघेल. केंद्रिय रेल्वे मंत्रालयाच्या 2013-14च्या अंदाजपत्रकात ही गाडी मंजूर झाली. सोलापूर रेल्वे विभागाने सकाळी साडेसहाची वेळ सुचवली होती. मात्र, सोलापुरातील राजकीय व्यक्तींनी रात्रीच्या वेळेसाठी आग्रह धरल्याने रेल्वे मंत्रालय वेळेची चाचपणी करत आहे. रात्रीची वेळ ठरल्यास रेल्वे बोर्डाला ओव्हरनाइटचा रेक द्यावा लागणार आहे.

लवकरच धावेल नवी गाडी
मंजूर झालेल्या गाडीच्या वेळेबाबत ठोस निर्णय होत नसल्यामुळे सोलापूरकरांना वाट पाहावी लागली. गाडीची वेळ रात्रीची होणार असल्याचे मानले जात आहे. वेळेचा तिढा सुटण्याचे संकेत असल्याने ही गाडी लवकरच धावण्याची चिन्हे आहेत.

शताब्दीला मिळणार नवा रेक
पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसचा जुनाट रेक (डबे) बदलणार आहेत. पूर्वी मंजूर झालेल्या जर्मन टेक्नॉलॉजी एलएचबी दर्जाचे अत्यंत हायसस्पेशन डबे लवकरच मिळवून देऊ, अशी ग्वाही मध्य रेल्वेचे प्रभारी सरव्यवस्थपाक बी. पी. खरे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. कपुरथळा येथून नवीन डबे बाहेर पडणार आहे. या संदर्भात रेल्वे बोर्डाशी चर्चा करणार आहे.