आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षांतर्गत वाद: राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीचे ग्रहण सुटता सुटेना!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- गत विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला लागलेल्या खंडग्रास ग्रहणाने गेल्या चार वर्षांत खग्रास रूप धारण केले आहे. शहरात अल्प अस्तित्व असलेल्या राष्ट्रवादीला काँग्रेसपुढे जाता येत नसल्याचे चित्र आहे तर ग्रामीणमध्ये ताकदवान असलेल्या राष्ट्रवादीला कणखर नेतृत्वाअभावी बॅकफूटवर जावे लागत आहे. सत्तेत महत्त्वाचे स्थान असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा फटका जिल्ह्याच्या विकासाला बसत आहे. ही बाब दुष्काळात जनतेची होरपळ वाढवणारी असल्याचे स्पष्ट होत आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदानंतर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजीचा रंग दिसून आला. जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्था ताब्यात ठेवून सर्वाधिक आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादीला गटबाजीच्या ग्रहणामुळे ओहोटी लागली आहे. जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांच्या निवडणुकीतही पक्षाला धक्का बसला आहे. जिल्ह्यात कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त अशी स्थिती दिसत आहे.

राष्ट्रवादीमध्ये कोठे-कोठे काय चालते हे माहिती असलेल्या काँग्रेसने नेहमीच राष्ट्रवादीला दाबण्यात यश मिळवले आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वावर जहाल टिका करणारे राष्ट्रवादीचे नेते व पालकमंत्र्यांना पुन्हा काँग्रेसबरोबरच जमवून घ्यावे लागल्याचे सोलापूरकर अद्याप विसरलेले नाहीत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांनीही महापालिका निवडणुकीत ऐकमेकांवर बोचरी टिका केल्याची आठवण आजही ताजी आहे.

काँग्रेसच्या ताकदीपुढे कमी असलेल्या राष्ट्रवादीला अंतर्गत गटबाजीचा फटका नेहमीच बसत असल्याने पक्ष संघटन मजबूत करण्यात यश येत नाही. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या एखाद्या वर्षासाठी काँगेसकडून मिळवण्यात राष्ट्रवादीच्या दबावतंत्राला यश मिळाले आहे. पण स्थायी समिती सभापतीपद कोणाला द्यायचे यावरून राष्ट्रवादीमधील वाद उफाळून आला. खरे तर पालकमंत्र्यांनी शहराध्यक्षाच्या बरोबरीने अगोदरच याबाबतचा निर्णय पक्षर्शेष्ठींना विचारून घेणे आवश्यक होते. परंतु कोठे माशी शिंकली माहिती नाही. पण सभापती उमेदवारीवरून वाद उफाळला आणि पक्षातील जुने नगरसेवक माजी उपमहापौर नाना काळे यांनी राष्ट्रवादीला झटका देऊन थेट युतीच्या तंबूचा रस्ता धरल्याचे सोलापूरकरांनी पाहिले. सकाळी युतीच्या तंबूत गेलेल्या नानांनी सायंकाळी घुमजाव करीत पुन्हा युतीला ना-ना म्हटले. पक्षाची बेअब्रू होण्यापासून वाचवण्यात शहराध्यक्षांना यश आले असले तरी पक्षांतर्गत गटबाजीने मात्र राष्ट्रवादीची अब्रू पुन्हा वेशीवर टांगल्याचे दिसून आले.

स्थायी सभापती पदापासून नानांना दूर ठेवल्याचे पडसाद अगामी विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. या राजकारणाचा फटका शहर उत्तरमधील आघाडीच्या उमेदवाराला पुन्हा बसण्याची शक्यता अधिक आहे.