आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Women Leader Shaila Godse Rebellious Issue At Solapur, Divya Marathi

शैला गोडसे यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- लोकसभेच्या निवडणुकीत ‘पानिपत’ करून घेणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादीने पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत घराणेशाहीला प्राधान्य दिले आहे. याविरोधात शैला गोडसे (आंबेचिंचोली, ता. पंढरपूर) आणि अरुण लाड (सांगली) यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे भाजपचे उमेदवार आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाठी पक्षाकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा तोंडावर पडण्याची चिन्हे आहेत.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने सिक्कीमचे राज्यपाल र्शीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी शैला गोडसे, अरुण लाड आदींनी जोरदार तयारी केली आहे. शिवाय राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पुणे जिल्ह्यातील शरद बुट्टे-पाटील यांनाही झुलवत ठेवले होते. शैला गोडसे यांचे पती धनंजय गोडसे शासकीय अधिकारी असून मतदारसंघात त्यांनी नेटवर्क उभारले आहे. गोडसे गेल्यावेळीही इच्छुक होते, मात्र राष्ट्रवादीने त्यांना हूल दिली. त्यांच्या पत्नी शैला गोडसे गेल्या तीन वर्षांपासून मतदारसंघात फिरत आहेत. पंढरपूर, सोलापूर, पुणे, सांगली, कोल्हापुरातील या भागात कार्यकर्ते नेमून निवडणुकीची तयारी केली आहे.

अरुण लाड यांनीही गुरुवारी सांगलीत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या वेळी ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत. लाड यांनाही पुणे, कोल्हापूर, सांगली आदी भागात निवडणूकपूर्व प्रचार यंत्रणा राबवली आहे, त्यांनी माघार घ्यावी यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे.