आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Commissioner Comment On Solapur City Development

विकासातील मानव निर्देशांक वाढवण्यास अधिक प्राधान्य; नूतन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘फक्त महसूल जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी म्हणून काम करणार नाही. शिक्षण, आरोग्य दरडोई उत्पन्न यावर अधिक भर देऊन मानव निर्देशांक वाढविण्यास अधिक प्राधान्य दिले जाईल. यासाठी इतर शासकीय विभागांची मदत घेऊन शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविणे, शासनाविषयी लोकांमध्ये चांगली प्रतिमा तयार करण्याच्या दृष्टीने गुड गव्हनर्स ही संकल्पना राबवणार आहे,’ असे नूतन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

डॉ. प्रवीण गेडाम यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मुंढे यांनी सोमवारी सकाळी १० वाजून मिनिटांनी पदभार स्वीकारला. दिवसभराच्या बैठकीनंतर त्यांनी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला.

जिल्हाधिकारी या नात्याने प्रत्येक गावाची समस्या सोडविण्यासाठी वैयक्तिक लक्ष असणार आहे. स्थानिक पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. ती कामे वेळेत होण्यासाठी वैयक्तिक भर राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुप्रशासन राबवणार
विकास कामे मार्गी लागण्यासाठी सुप्रशासन राबवणार आहे. तलाठ्यांपासून ते माझ्यापर्यंत सर्वांना कामाबाबत एकच नियम असणार आहे. यापूर्वी जिल्ह्यात काम केल्याने बरीचशी माहिती आहे. काही कठोर निर्णयही घेतले जातील, जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाईही करण्यात येईल.

स्वच्छता आतूनही...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार कार्यालयांची स्वच्छता ठेवण्यात येईल. यासाठी लवकरच मोहीम राबविण्यात येईल. यामध्ये सर्व शासकीय कार्यालयांची आतून आणि बाहेरून स्वच्छता करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मुंढे यांनी सांगितले.

ही आहेत आव्हाने
जिल्ह्यातील १७२ अनधिकृत दगडचालकांकडून दंडवसुली, जुळे सोलापुरातील ६५ रस्त्यांची चौकशी कारवाई, मतदारयादीतील बोगस नावे, कोंडी येथील बोगस एनए प्रकरण, पंढरपूर तालुक्यातील पुनर्वसन जमिनींचा अहवाल, सात-बारा उताऱ्यांचे संगणकीकरण.

सर्व सामान्यांच्या कामांना प्राधान्य...
^जिल्ह्यातील एकाही सर्वसामान्य व्यक्तीची अडवणूक होणार नाही, यासाठी प्राधान्य असणार आहे. शासकीय कामकाजांमध्ये सुधारणा करीत पारदर्शकता गती देण्याचा प्रयत्न असणार आहे. यामुळे अधिकाधिक योजना लोकांपर्यंत कमी वेळेत पोहोचतील त्याचा लाभ देता येईल.'' तुकाराममुंढे, जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सोमवारी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख आदी. '

प्रत्येक अधिकाऱ्याच्या कामाचा घेणार आढावा
गेल्यावर्षात आपण काय केले आहे, याचा आढावा घेतला जाईल. चालू वर्षी उद्दिष्ट काय आहे, आतापर्यंत काय साध्य झाले आहे, काय साध्य होणार आहे, आपल्या विभागाचे उद्दिष्ट काय आहे, ते साध्य करण्यात किती यशस्वी झालो आहोत, याचा आढावा घेऊन नियोजन करण्यात येणार असल्याचे श्री. मुंढे म्हणले.

जिल्ह्याचा विकास हेच ध्येय
जिल्हाधिकारी कार्यालय महसूल विभाग काम करताना समन्वयाने लोकांची कामे करण्याचे आवाहन करीत जिल्हाधिकारी मुंढे यांनी जिल्ह्याचे पर्जन्यमान, संभाव्य टंचाई स्थिती, गारपीट अनुदान वाटप, बोरामणी विमानतळ संपादित जमीन, सेतूचे कामकाज, राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, ई- चावडी प्रकल्प, जमीन प्रकरणाची सुनावणी, प्रस्तावित महसूल भवन, लोकशाही दिनातील तक्रारी आदींचा आढावा घेत प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे सर्व विभागप्रमुखांना आवाहन केले.