आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Dispute On Raj Thackarey's Public Meeting Place

राज ठाकरेंच्या सभेसाठीच्या वृक्षतोडीचे प्रकरण दडपले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी नॉर्थकोट मैदानातील पाच झाडे तोडल्याच्या प्रकरणाची चौकशी उद्यान विभाग, वनविभागाने अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत दडपली. महापालिकेच्या समोर दिवसाढवळ्या तोडलेल्या झाडांची चौकशी करण्याचे भान महापालिका व नॉर्थकोट प्रशालेच्या अधिका-यांनाही राहिले नाही, हे विशेष.

राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी नॉर्थकोट मैदानाची स्वच्छता करताना प्रशालेच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूची चार व उजव्या बाजूचे एक अशी पाच झाडे बुंध्यापासून तोडण्यात आली. त्यामध्ये कडूनिंबाच्या एका मोठ्या झाडाचा समावेश आहे. तोडण्यात आलेल्या झाडांच्या फांद्याची तातडीने विल्हेवाट लावण्यात आली. त्याबाबतची कोणतीही परवानगी संबंधित विभागांकडून घेण्यात आली नव्हती. त्या घटनेला 15 दिवसांचा कालावधी लोटला. पण, त्याकडे महापालिकेच्या उद्यान विभागासह वनविभागाच्या अधिका-यांनी दुर्लक्ष केले. सभेदरम्यानची दुर्घटना टाळण्यासाठी झाडांच्या फांद्या तोडल्याचे सांगणा-या मनसेच्या पदाधिका-यांनी त्याबाबत उद्यान विभाग व वनविभागाकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती. महापालिकेच्या कार्यालयासमोरच अवैध पद्धतीने तोडलेल्या झाडांकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी सोईस्कर दुर्लक्ष केले. झाडांच्या वाळलेल्या फांद्या तोडण्यास परवानगी दिल्याचे नॉर्थकोट प्रशालेच्या प्राचार्यांनी सांगितले होते. पण, त्यांनीही तोडलेल्या झाडांबाबत मौन बाळगले आहे.

त्यांचा अहवाल आल्यानंतर बघू
नॉर्थकोट मैदानातील झाडे तोडण्याच्या घटनेदिवशी मी रजेवर होतो. त्याबाबतची माहिती अद्याप माझ्याकडे आली नसून, साहाय्यक अधिका-यांकडून ती मिळवण्यात येईल. त्यांच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेऊ.’’
मदन कांबळे, उद्यान अधीक्षक, महापालिका

चौकशी करणे राहून गेले
नॉर्थकोट प्रशालेतील झाडे तोडण्याची व लाकूड वाहतुकीसाठी कुणी परवानगी आमच्याकडे मागितली नव्हती. पण, त्याबाबतची पुढील चौकशी करण्याचे राहिले. संबंधितांना पत्र पाठवून त्वरित चौकशी पूर्ण करू.’’
दादासाहेब हजारे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सोलापूर

अधीक्षकांना अहवाल दिला
झाडे तोडण्याबाबत कुणी परवानगी घेतली नाही अन् आम्ही कुणालाही दिली नव्हती. तोडलेल्या झाडांचा पंचनामा करून अहवाल चार दिवसांपूर्वीच मी प्रत्यक्षात उद्यान अधीक्षकांना दिला आहे. पुढील निर्णय त्यांच्या अखत्यारीतील आहे.’’
विश्वास शिंदे, साहाय्यक उद्यानविभाग प्रमुख