आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांची सीमोल्लंघनाची तयारी, पण नव्या सीमा कोणत्या?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जिल्ह्यातील अनेक नेते सीमा ओलांडून वेगळ्या राजकीय दिशेने निघण्याच्या तयारीला लागले आहेत. कोणी काँग्रेस तर कोणी शिवसेनेच्या जवळ जाण्याचा प्रयत्नात आहे. कोण कसे सीमोल्लंघन करणार याकडे लक्ष लागले आहे.

सोलापूर- जिल्ह्यातील नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांना लोकसभेसाठी गळ घालून मुंबईतून दिल्लीत पाठवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पण मोहिते-पाटील यांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे सीमोल्लंघन घडवून आणायचे ठरवले आहे. जर तेही शक्य झाले नाहीच तर मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये सीमोल्लंघन करतील अशीही चर्चा आहे. गेल्यावेळी माढय़ातून लढलेले सुभाष देशमुख यांच्यासमोरही कोणते सीमोल्लंघन करायचे असा पेच उभा राहिला आहे. सोलापूर दक्षिण किंवा उस्मानाबाद असे कुठे तरी सीमोल्लंघन करायचेच असा चंग त्यांनी बांधला आहे. मात्र, या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचाच दसरा साजरा होणार असल्याने तो आपल्याकडे कसा घेता येईल, याचा प्रयत्न ते चिकाटीने करताना दिसतात. त्यासाठी ते ‘उद्धव ठाकरे’ यांना दसर्‍यानिमित्त आपट्याचे पान घेऊन मातोश्री वर जातील का? याची उत्सुकता आहे.

गेल्या चार वर्षांत शहर मध्य विधानसभा मतदार संघातून चर्चेत राहिलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांचे सीमोल्लंघन लोकसभेसाठी होईल अशीही चर्चा रंगत आहे. पण त्यांना ही संधी त्यांचे पिता देतील का? हाही प्रश्‍न आहे. कमळाला हातात घेऊन नाही जमले तर रेल्वेचे इंजिन घेऊन लोकसभेच्या ट्रॅकवर येण्याचे प्रयत्न प्रतापसिंहांनी जोरदार सुरू केल्याची चर्चाही रंगली आहे. सातार्‍याच्या दरबारातूनही त्यांना दसर्‍याच्या विशेष शुभेच्छा आहेत. विधानसभेत सर्वात ज्येष्ठ असलेले शेकापचे नेते गणपतराव देशमुख ‘सांगोल्या’ऐवजी ‘माढय़ा’तून सीमोल्लंघन घडवून आणण्याचाही प्रयत्न सुरू झाला आहे. अपक्ष राहिलेले भारत भालके सीमा ओलांडणार हे जवळपास निश्चितच आहे. पण नवी सीमा काँग्रेस की राष्ट्रवादी? यातच ते चाचपडत आहेत.