आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला दे धक्का, नलिनी चंदेले भाजपमध्ये; कोठेंचे आज शक्तिप्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - माजी महापौर नलिनी चंदेले यांनी काँग्रेसला रामराम करून गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूकलढण्याची त्यांची इच्छा आहे. महेश कोठे यांच्यानंतर काँग्रेसला बसलेला हा दुसरा जबर धक्का आहे. 2009 मध्ये त्यांना शहर मध्य मतदासंघातून लढायचे होते.
चंदेले यांच्या भाजपप्रवेशावेळी त्यांचे भाऊ चंदनसिंग रोटेले उपस्थित होते. याबाबत चंदेले म्हणाल्या, ‘‘चिमूर माझे माहेर आहे. येथूनच विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असून उमेदवारी मिळण्याची आशा आहे. काँग्रेस सोडण्याची कारणे लवकरच स्पष्ट करेन. ’’ त्या सोमवारी सोलापुरात येत आहेत. त्यानंतर भूमिका स्पष्ट करतील.

काँग्रेसचे आजपासून जनसंपर्क अभियान

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत गेलेले महेश कोठे उद्या जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. दुसरीकडे काँग्रेसनेही तयारीसाठी कंबर कसली आहे. शहर काँग्रेस कमिटी पदाधिका-यांच्या सत्काराच्या निमित्ताने शनिवारी काँग्रेस भवनात कार्यक्रम होणार आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उपस्थिती राहणार असून ते काय बोलतात, याकडेच लक्ष लागले आहे.

शनिवारी सायंकाळी पाच वाजता काँग्रेस भवनात शहर काँग्रेस कमिटी पदाधिकारी नियुक्त्या आणि त्यांचा सत्कार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोलापुरात तळ ठोकून असलेले शिंदे विभागनिहाय बैठका घेऊन आढावा घेत आहेत. महेश कोठे यांनी शिवसेनेत तर माजी महापौर नलिनी चंदेले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उद््भवलेल्या राजकीय परिस्थितीवर शिंदे जाहीरपणे कोणती भूमिका मांडतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ‘जे गेले त्यांना जाऊ द्या. जे आहेत त्यांना घेऊन लढूया,’ अशी भूमिका त्यांनी यापूर्वीही जाहीर केली होती.

शिवसैनिक महेश कोठेंच्या स्वागताला भगवी रॅली - नवशिवसैनिक महेश कोठे यांच्या स्वागतार्थ सोलापूर शिवसेना जुना पुणे नाका येथून भगवी रॅली काढणार आहे. यावेळी हजारो मोटारसायकलस्वार सहभागी होतील. शहर मध्य विधानसभा मतदारसंघामार्गे जाणा-या या रॅलीमुळे शुक्रवारी सारे वातावरणच भगवेमय होणार आहे. जय भवानी, जय शिवाजीचा नाराही दुमदुमणार आहे.

कोठे यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. शुक्रवारी सकाळी ते सोलापुरात दाखल होणार आहेत. सकाळी 10 वाजता जुना पुणे नाका येथून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅली सुरू होणार आहे. जुना पुणे नाका, शिवाजी चौक, डॉ आंबेडकर चौक, रामलाल चौक, मरिआई चौक, सलगर वस्ती, मोदी, सात रस्ता, शांती चौक, भद्रावती पेठ, दत्तनगर, पद्मशाली चौक, बेडर पूल, जगदंबा चौक , सात रस्ता, जुने आरटीओ कार्यालय, नवल पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन, भय्या चौक मार्गे जुनी मिल चाळ येथे समारोप होणार आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, जिल्हा सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहरप्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित असतील.