आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाच्या लहरीपणावर ब्रह्मपुरीच्या शेतक-यांचा शेडनेट तंत्रज्ञानाचा तोडगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा - भारतीय शेती ही पावसावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती उद्योग दिवसेंदिवस अडचणीत येत असताना ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील शेतकरी रावसाहेब पाटील व सुनील पाटील यांनी शेडनेटचे तंत्र वापरून शेती उद्योगात क्रांती केली आहे. अन्य शेतक-यांनी याचे अनुकरण केल्यास शेती उद्योग निश्चित भरभराटीला येऊन शेतक-यांचे जीवनमान उंचावेल.

ब्रह्मपुरी येथील पाटील द्वयींनी जिल्हा कृषी माहिती कार्यालयाकडून शेडनेटचे तंत्रज्ञान अवगत करून येथील बँक ऑफ महाराष्ट्र कडून शेडनेट उभारण्यासाठी कर्ज घेतले. एका एकरमध्ये शेडनेट उभारणी केली असून सध्या यामध्ये सिमला मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे. त्यापासून दीड टन उत्पादन मिळाले आहे. बाजारात या मिरचीला 30 ते 40 रुपयांचा दर मिळत आहे. लागवडीपासून 60 दिवसांत उत्पादन चालू झाल्याचे रावसाहेब पाटील यांनी सांगितले. एका एकरमध्ये सिमला मिरचीची 11 हजार रोपांची लागवड केली. 5 बाय सव्वा फूट अशा स-या सोडल्या. दोन बेडमध्ये पाच फूट अंतर सोडले. दोन स-यांमध्ये सव्वा फूट अंतर आहे. जमिनीवर मल्चिंग पेपर अंथरून रोपांची लागवड केली. मल्चिंग पेपरचा खर्च 17 हजार, रोपांचा खर्च 25 हजार, खते 15 हजार, इतर खर्च 60 हजार असा उत्पादन चालू होईपर्यंतचा खर्च आहे. मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, नागपूर येथे सिमला मिरचीला चांगला दर मिळतो. इंद्रा व सिमला या जाती असून एक मिरची 300 ते 350 ग्रॅम वजनाची असते. आठवड्यात अडीच टन उत्पादन निघतो.

50 टक्के अनुदानावर उपलब्ध
शेडनेट उभारणीसाठी जवळपास 16 लाख रुपये खर्च असून पन्नास टक्के अनुदानावर ते उपलब्ध आहे. ठिबक सिंचनवर शेडनेट प्रक्रिया होत असून अल्प मजुरांवर हा व्यवसाय चालतो.

तालुक्यात यांनी उभारले शेडनेट
प्रकाश काळुंगे (फटेवाडी), सुनील डोके (माचणूर), अतुल पाटील (रहाटेवाडी), अंकुश पडवळे (खुपसंगी), श्रीमंत सपताळे (डोंगरगाव), प्रशांत चव्हाण, शरद हेंबाडे, विनोद सावंत (सर्व मंगळवेढा), संभाजी नागणे (आंधळगाव).

- शेडनेट मध्ये वांगी, टोमॅटो, खरबूज, कलिंगड याचे उत्पादन उच्च प्रतीचे निघते. मार्केटमध्ये चांगला दर मिळाल्यामुळे शेतक-यांची आर्थिक परिस्थिती सुधारते. शेतक-यांनी पारंपरिक पध्दत सोडून नवीन तंत्राचा शेती व्यवसायात वापर क रावा.’’ रावसाहेब पाटील, ब्रह्मपुरी