आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनी जलाशय मृतसाठय़ात नव्या पाण्‍याची आवक सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गेल्या जानेवारीपासून तळ गाठलेल्या उजनी धरणाने अखेर बुधवारी ‘डेड स्टोअरेज’ला मागे टाकत अधिक एक टक्के (64.66 टीएमसी) इतका जलसाठा गाठला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत अधिक एक टक्के इतका जलसाठा उजनीत होता. गेल्या काही दिवसांतील पाऊस आणि वरच्या धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे उजनीतील जलसाठा वाढू लागला आहे.

गेल्या वर्षी 102 टीएमसी इतका जलसाठा होता. हळूहळू तो कमी होऊन जानेवारी 2013 मध्ये वजा 50 टक्क्यांवर पोहोचला होता. शेतीसाठी बेसुमार उपसा आणि गेल्या काही वर्षांत पाण्याचे ऑडिटच न झाल्याने उजनी धरणातील पाण्याने ‘डेड स्टोअरेज’ गाठले होते. यंदा जूनपासूनच पावसाने हजेरी लावल्याने व पुणे जिल्ह्यातील धरणेही 80 टक्क्यांवर भरत आल्याने तेथूनही पाणी सोडल्याने उजनी धरणातील जलसाठा वाढायला सुरुवात झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, चासकमान, भामा-आसखेड आदी धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे उजनी धरणात बुधवारी सकाळी 10 वाजता 64 टीएमसी असलेली डेडस्टोअरेजची र्मयादा ओलांडली. सायंकाळी सहा वाजता 64.66 टीएमसी इतका जलसाठा उपलब्ध झाला. तो मीटरमध्ये 491.172 इतका होता, तर टक्केवारीत तो 1.86 टक्के इतका आहे.


मध्यम प्रकल्प कोरडेच
जिल्ह्यात सहा मध्यम प्रकल्प असून, ते कोरडेच आहेत. एकरूख (उत्तर सोलापूर), जवळगाव (बाश्री) तलावांत शून्य जलसाठा आहे. आष्टी (मोहोळ) तलावात वजा 29, मांगी (करमाळा) वजा 3 , जवळगाव (बाश्री) वजा 44, हिंगणी (बाश्री) वजा 28, पिंपळगाव (बाश्री) वजा 15 टक्के साठा आहे.


उजनी धरणातील पाण्याने 4 जानेवारी रोजी मृतसाठा गाठला होता. ही पातळी वजा 50 टक्क्यांपर्यंत खाली गेली होती. आषाढी वारीसाठी 2.45 टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. आता पाणी सोडण्याचे कोणतेच नियोजन नाही. पुढचेही नियोजन ठरलेले नाही. पावसाचे प्रमाण जितके वाढेल तितका जलसाठा उपलब्ध होईल.’’ अजय दाभाडे, अधीक्षक अभियंता, उजनी लाभक्षेत्र


नीरा नदीत सोडणार पाणी
वीर धरण 85, भाटघर 82 व देवधर धरण 84 टक्के भरले आहे. या धरण क्षेत्रातील पाऊस सध्या थांबला आहे. वीर धरणात 24 तासाला अर्धा टीएमसी पाणी येत आहे. हे धरण गुरुवारी रात्रीपर्यंत 90 टक्के भरेल. तेथून ते पाणी निरा नदीत सोडण्यात येणार आहे.’’ तानाजी जेंगठे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, फलटण

वरील धरणांचा विसर्ग
सायंकाळी 6 ची स्थिती क्युसेक्समध्ये
0मुळशी : 12000
0खडकवासला : 48.47
0चाकसमान : 48.87
0पवना : 7846
0येडगाव : 2553
0वडूज़ : 6.17
0कळमोडी : 7.21
0भामा आसखेड : 1282
0वडीवळे : 267.7
0कमराई : 540
0दौंड : 43154
0बंडगार्डन : 27627