आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंढरपूरला दर्शनाला निघालेल्या भावीकांच्या कारला अपघात, चौघांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - पंढरीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या इंडिका कारला इनोव्हाने समोरून धडक दिल्यामुळे चौघांचा मृत्यू झाल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील ताकविकी शिवारात घडली. हा भीषण अपघात सोमवारी पहाटे 5.45 वाजता घडला.
शंकर गोविंद मार्डे (30), बालाजी पिंटू सगर (45), चालक नागनाथ नरसिंग बिरादार (35, करकाळा) व इनोव्हाचा चालक नितीन भीमराव सांगवे (30, अनगरवाडी, ता. चाकूर, जि. लातूर) अशी मृतांची नावे आहेत.

कर्नाटक राज्यातील करकाळा (ता. औराद, जि. बिदर) येथील सहा जण इंडिका कारने (एमएच 43 ए 7872) पंढरपूरला जात होते. लातूर ते तुळजापूर रस्त्यावरील ताकविकी शिवारात आल्यानंतर समोरून भरधाव येणार्‍या इनोव्हा गाडीने (एमएच 24 व्ही 77) कारला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे इंडिका कार पूर्णपणे चेंदामेंदा झाली. इंडिका कारमधील तिघांसह इनोव्हा चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कारमधील सुरेश एकनाथ सगर, एकनाथ किसन सगर व व्यंकट मल्लाप्पा सगर (तिघे रा. करकाळा) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सोलापूरला हलवण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
ग्रामस्थांची मदत
अपघात झाल्याची माहिती मिळताच ताकविकी येथील तंटामुक्ती समितीचे बालाजी ठाकूर यांनी ग्रामस्थांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना रुग्णालयात हलवले. सर्व प्रवासी गाडीत अडकले होते. कारचा पत्रा कापून मृत, जखमींना बाहेर काढावे लागले.
फोटो - अपघातानंतर झालेली कारची अवस्था