आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर रेल्वे स्थानकावर मला झाली होती अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- देशात १९७५मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती. त्यास २५ जूनला ४० वर्षे पूर्ण होत आहेत. अलीकडेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी देशात पुन्हा आणीबाणी येऊ शकते, असे वक्तव्य केले आहे. त्यापार्श्वभूमीवर घेतलेला वेध...
आणीबाणी जारी झाल्यानंतर देशाच्या परीक्षेचा अंदाज आल्यानंतर मी भूमिगत होण्याचा निर्णय घेतला. मी आणि मृणाल गोरे दोघेही भूमिगत झालो. मी १६ महिने भूमिगत होतो, अशी माहिती ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांनी दिली.

“२५ जून १९७५ ला एस. एम. जोशी, राजहंस आणि मी असे तिघे मिळून जयप्रकाश नारायण यांना भेटण्यासाठी बिहारमधील पाटणा शहरात गेलो होतो. पाटणा रेल्वे स्थानकावरून जयप्रकाश यांना संपर्क करत होतो. मात्र, काही केल्या संपर्क होत नव्हता. त्या वेळी रेल्वे स्थानकावर अचानक एका शेजारच्या प्रवाशाच्या रेडिओवरून पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावल्याची बातमी एेकली.
ही बातमी ऐकताच आम्ही तेथून निघण्याचा निर्णय घेतला. एस. एम. जोशी मात्र तिथे थांबले होते. तेवढ्यात बिहारचे पोलिस मंत्री रामानंद तिवारी स्थानकावर दाखल झाले. त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही जयप्रकाश नारायण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत.” “भूमिगत होऊन काम करत होतो. माझ्या नावाने वॉरंट निघाले होते. तरीही भूमिगत राहून मी गुप्त पत्रके छापण्यास सुरुवात केली. त्यावेळी वर्तमानपत्रांचा मजकूर छापण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागायची. आम्ही मात्र गुप्त पत्रके छापून पोस्टाच्या माध्यमातून देशाच्या कानोकोपऱ्यात पाठवून दिली. या काळात पोलिस अधिकाऱ्यांकडून सामान्य नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास झाला. भूमिगत असल्याने सारखं ठिकाण बदलावे लागे. ठिकठिकाणी फिरावे लागायचे. नोव्हेंबर १९७६ मध्ये अहमदनगर रेल्वे स्थानकावर मला अटक करण्यात आली. त्यानंतर माझी रवानगी नाशिकच्या तुरुंगात करण्यात आली.
काँग्रेसचा दारुण पराभव
२५ जानेवारी १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांनी देशात सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. त्यानंतर तुरुंग प्रशासनाने मला सोडले. देशात काँग्रेसविरोधी वातावरण चांगलेच तयार झाले होते. अशात काँग्रेस विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टीची स्थापना केली. मार्च १९७७ मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. आणि अपेक्षेप्रामाणे काँग्रेसचा दारुण पराभव झाला. अन् मोरारजी देसाई देशाचे पंतप्रधान झाले.
सोलापुरातून २०० जण तुरुंगात
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ मध्ये आणीबाणी जाहीर केली. तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी घटनेच्या ३५२ (१) नुसार आणीबाणीचा आदेश जारी केला. २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ अशा २१ महिन्यांच्या कालावधीत भारताने आणीबाणी अनुभवली. सोलापुरातून जवळपास २०० जणांना तुरुंगात जावे लागले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला. पण सोलापुरात काँग्रेसचे दमाणीच निवडून आले.
बातम्या आणखी आहेत...