आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारीच्या तोंडावर तीर्थक्षेत्रांचा विकास, पंढरीसाठी 273 कोटींच्या निधीला मंजुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील श्रीक्षेत्र देहू-आळंदी-पंढरपूर, अमरावती जिल्ह्यातील मोझरी आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील विविध विकासकामे जून 2015पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे श्रीक्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर (तुकोबा स्थान, जि. पुणे) तीर्थक्षेत्र विकास आराखडा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्रीक्षेत्र मोझरी तीर्थविकास आराखडा आणि शेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक झाली.

देहू आळंदी, पंढरपूर भंडारा डोंगर या तीर्थक्षेत्र विकासांच्या कामांचा आराखडा मंजूर करण्यात आला होता. या पहिल्या टप्प्यातील मंजूर आराखड्यातील कामांच्या वाढीव किमतींना सोमवारी मंजुरी देण्यात आली. या कामांमध्ये खासगी क्षेत्राचा जो सहभाग होता त्याऐवजी शासकीय यंत्रणांमार्फत ही कामे केली जाणार आहेत. तसेच या बैठकीत देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर येथील विकास कामांच्या नवीन आराखड्यासदेखील मंजुरी देण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल, जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ), पर्यावरण मंत्री संजय देवतळे, आमदार यशोमती ठाकूर, डॉ. संजय कुटे आदी या बैठकीस उपस्थित होते.

मोझरीसाठी मुदतवाढ
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तीर्थक्षेत्र मोझरी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याचे काम जून 2015 पर्यंत करण्यास मुदतवाढ दिली आहे. तसेच नवीन कामांसाठी दुसर्‍या टप्प्याचे नियोजन करण्याच्या देखील सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

पंढरीसाठी 273 कोटी
पंढरपूरमध्ये भूसंपादनासाठी 164 कोटी रुपये, विकासकामांसाठी 77 कोटी रुपये तर अन्य प्रशासकीय कामांसाठी 23 कोटी रुपयांच्या निधीस बैठकीत मंजुरी देण्यात आली. नव्या कामांमध्ये पालखी मार्गाच्या विकासाच्या कामाचा समावेश आहे.
शेगावसाठी 496 कोटी
गजानन महाराज शेगाव (जि. बुलडाणा) तीर्थक्षेत्राचा सुधारित विकास आराखडा 496 कोटी रुपयांचा झाला असून त्याला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ही सर्व पहिल्या टप्प्यातील कामे वर्षभरात पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.