आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय ध्यान योग : जगन्मान्य पावलेली जीवनपद्धती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जागतिक आरोग्य संघटनेने, जो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सामाजिक व्यवहार्यक्षम आहे, त्याचे आरोग्य उत्तम. अशी उत्तम आरोग्याची सर्वसमावेशक व्याख्या केलेली आहे.
शारीरिक सक्षमतेकरिता उत्तम आहार-विहाराची गरज आहे. एखादा माणूस शारीरिकदृष्ट्या पोलादाप्रमाणे सक्षम आहे. मात्र, त्याचे मानसिक संतुलन बिघडले असेल तर जगात त्याची गणना वेडा किंवा मनोरुग्ण या पलीकडे होत नाही. त्याउलट एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या असाध्य आजाराने पीडित आहे, पण औषधांसह प्रचंड इच्छाशक्तीच्या अर्थात मानसिक सक्षमतेसाठी योगाच्या जोरावर सर्वसामान्य निरोगी माणसांपेक्षा सर्वार्थाने सक्षम असेल, तर ती व्यक्ती सर्वाेत्तम योगसाधक म्हणावी लागेल. ध्यान साधनेला योगाचे मूलभूत अंग समजले जाते. अर्थात योगात जितके महत्त्व प्राणायाम आणि योगासनांना आहे, तितकेच ध्यान साधनेला आहे. ध्यान साधना १२ वर्षांनंतरच्या सर्व वयोगटातील कसल्याही शारीरिक क्षमतेच्या स्त्री-पुरुषाला करता येते. पद्मासन किंवा निद्रित शवासन अवस्थेत ब्रह्मांडाचा वेध घेता येणारी अनुभवांती जगन्मान्य ध्यान साधना ही ११२ प्रकारांत विकसित झालेली व्यापक प्रक्रिया आहे.
शेकडो वर्षांपासून प्राचीन भारतीय योगसाधनेच्या जगन्मान्य संशोधनाकरिता असंख्य हिंदू, जैन, बौद्ध धर्मातील ऋषी-मुनी, साधू-संतांनी आणि प्रतिभावंतांनी आयुष्य वेचले. योगाचा प्रचार, प्रसार आणि संशोधन करत अजरामर झाले. ती प्रक्रिया आजही चालूच आहे. योगाला वैश्विक स्तरावर अधिष्ठान मिळवून देण्यात अनेकांचे कार्य अद्वितीय आहे.

त्यापैकी अलीकडच्या काळातील प्रातिनिधिक जागतिक गुरू म्हणून जे. कृष्णमूर्ती, आचार्य रजनीश ओशो आणि श्री श्री रविशंकर यांचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल. योग साधनेला वैश्विक स्तरावर परमोच्च स्थानी पोहोचवण्यात या तिन्ही जागतिक गुरूंचे कार्य मौलिक स्वरूपाचे आहे.
श्री श्री रविशंकर (जन्म: १३ मे १९५६) सुमारे ३५ वर्षांपासून श्वसनावर आधारलेल्या प्राणायामाचे धडे सर्व देशांत देत आले आहेत. त्यांनी विकसित केलेली सुदर्शनक्रिया जगातील कोट्यवधी साधकांनी मान्य केलेली आहे. बंगळुरू येथे त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या १७ ते १९ फेब्रुवारी २००६ दरम्यान रजत जयंती समारंभास जगभरातून आलेल्या सुमारे २५ लाख साधकांनी एकाच वेळी ध्यान योगात विक्रमी सहभाग नोंदवला. तेव्हापासून जीवनात प्रेमाचे महत्त्व सांगणाऱ्या गुरुजींचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात गेले.
आचार्य ओशो (जन्म: ११ डिसेंबर १९३१, मृत्यू : १९ जानेवारी १९९०) यांनी भारतीय दर्शनशास्त्रातील ध्यान योगाच्या सर्व ११२ संकल्पनांवर शास्त्रीय अंगाने भाष्य केले. ध्यानानेे विश्राम साक्षित्व आणि अनिर्णयात्मक दृष्टिकोन देण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या मते ध्यान योगाची केवळ सुरुवात करता येते. मात्र त्याला कसलाच अंत नाही, ध्यान योगाची संकल्पना मांडताना, माणसाचा जन्मदिवस म्हणजे त्याची जन्मतारीख नव्हे, तर तो ज्या दिवशी स्वत:ला आेळखतो त्याच दिवशी त्याचा जन्मदिवस असतो, अशी त्यांची धारणा होती.
जे. कृष्णमूर्ती (जन्म: ११ मे १८९५, मृत्यू : १७ फेब्रुवारी १९८६) यांनी ध्यान योगाकडे शून्यात जाऊन अंतर्मुख होऊन तटस्थपणे अभ्यासण्याची जगाला शिकवण दिली. ध्यान योगाकडे महान कला म्हणून पाहिले. तंत्राशिवाय सराव करून ही कला शिकावी, असे त्यांचे मत होते. ध्यान म्हणजे विचारांचा अंत... जो काळापलीकडे वेगळ्या मितीत घेऊन जातो, असे त्यांंचे मत होते. ज्ञात गोष्टी काढून टाकून मन रिकामे करणे म्हणजे ध्यान योग अशी त्यांची धारणा होती. त्यांनी योग सिद्धांत जगभरात मांडला, पण स्वत:ला कधी गुरू मानले नाही.
बातम्या आणखी आहेत...