आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामात हयगय केल्यास खपवून घेणार नाहीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- आषाढी यात्रेत पालखी मार्गावर भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्व विभागांनी आपसात योग्य तो समन्वय ठेवून त्या दृष्टीने संबंधित विभागांनी नियोजन करून ही यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावी. ठरवून दिलेल्या कामात कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्यांनी वा कर्मचाऱ्यांनी हयगय केल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिला.
प्रशासनातर्फे यात्रेच्या तयारीचा आढावा प्रांत कार्यालयात मंगळवारी (दि. ३०) घेण्यात आला. त्यावेळी श्री. देशमुख यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, प्रांताधिकारी संजय तेली, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, तहसीलदार गजानन गुरव, नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, वारीच्या पालख्या जिल्ह्यात प्रवेश केल्यापासून सर्व शासकीय यंत्रणेने सतर्क राहावे. जिल्ह्यात एकूण १४ नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहेत. पंढरपूर तालुक्यातील पालखी तळावर तीन नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार अाहेत. त्यात पिराची कुरोली, भंडीशेगाव, वाखरी रिंगण सोहळा आणि शहरात विविध ठिकाणी हे नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहेत. नगरपालिकेने रस्त्यांवरील अतिक्रमणे काढावीत, स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याची तपासणी करावी. पाटबंधारे विभागाने वेळेत पाणी सोडण्याचे नियोजन करावे. अन्न औषध प्रशासन विभागाने अन्न भेसळबाबत दक्षता घेऊन भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
२५ व्हिडिओ कॅमेरे सहा स्क्रीन बसविणार
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत पत्राशेड दर्शनरांगेचे काम सुरू केले असून आषाढी यात्रा कालावधीत मंदिर समितीमार्फत दर्शन रांगेतील भाविकांना शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दर्शन मंडपामध्ये भाविकांना मंदिर समितीच्या वतीने २४ तास चहा देण्याची सोय करण्यात येणार आहे. दर्शन मंडप आणि संपूर्ण दर्शन रांगेमध्ये २५ व्हिडिओ कॅमेरे सहा मोठे स्क्रीन लावण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी दिली.

या वर्षी आषाढी एकादशीचा सोहळा २७जुलैला होणार आहे. त्यापूर्वी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत आहे. मध्यंतरी उच्च न्यायालयाकडून स्वच्छतेसंदर्भात जनहित याचिकेच्या सुनावणीत चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांना तंबू, राहुट्या उभारण्यास मज्जाव करण्यात आला आहे. वारकऱ्यांमुळेच अस्वच्छता होते असा झालेला कलंक पुसण्यासाठी आता सर्वंच वारकरी संघटना आता प्रत्यक्ष स्वच्छता सहभागातून उपक्रम होती घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून आळंदी येथील चोपदार फाउंडेशन आणि पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट यांच्यातर्फे सुमारे ५० हजार प्लास्टिकच्या कॅरिबॅगचे प्रस्थानावेळी वाटप करण्यात येणार आहे.
सुमारे वीस किलो कचरा एका कॅरिबॅगमध्ये साठविता येईल. माउलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडी प्रमुखाकडे अशा प्रकारच्या शंभर पिशव्या प्रस्थानावेळीच देण्यात येणार आहे.