आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाखरीत रंगले उभे रिंगण, संत तुकाराम महाराज, माउलींची पालखी आज पंढरीत दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत तुकाराम महाराज पालखी (वाखरी) - जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील जिल्ह्यातील दुसरे उभे रिंगण सोमवारी वाखरी परिसरात रंगले. रिंगणातील अश्व बिथरून वारकर्‍यांमध्ये घुसला. त्यामध्ये कुणीही जखमी झाले नाही. अचानक झालेल्या प्रकारामुळे रिंगण पाहण्यासाठी थांबलेल्या वारकर्‍यांमध्ये काही काळ घबराट पसरली.

पिराची कुरोली येथील पाहुणचार घेऊन तुकोबांच्या पालखी सोहळ्याने सकाळी दहा वाजता पंढरीकडे प्रस्थान ठेवले. बाजीरावच्या विहिरीजवळ दुपारी चार वाजता संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यातील उभे व गोल रिंगण झाले. त्यानंतर मागून आलेल्या संत तुकाराम महाराजांच्या सोहळ्यातील उभे रिंंगण पाहण्यासाठी वारकर्‍यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, पण नेहमी बाजीरावच्या विहीर परिसरात होणारे तुकोबांचे रिंगण दीड ते दोन किलोमीटर लांब झाले. त्यामुळे रिंगण पाहण्यासाठी बसलेल्या वारकर्‍यांना पुन्हा दिंडीत सहभागी होऊन रिंगण पाहण्यासाठी जावे लागले. तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे चोपदार अर्जुन गिराम यांनी रिंगण लावून घेतले. माउली-तुकोबांचा जयघोष वाढला अन् उभ्या रिंगणासाठी अश्व चौखूर उधळत निघाले, पण पालखीला प्रदक्षिणा घालून परत येताना अचानक स्वाराचा अश्व पुढचे दोन पाय उभे करून जागीच फिरू लागला. स्वाराने तत्काळ त्यास नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तो अश्व थेट रिंगण गर्दीत घुसला, पण सुदैवाने कुणी जखमी झाले नाहीत. रिंगण सोहळ्यानंतर पालखी मुक्कामासाठी वाखरी येथील तळावर विसावली.

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे पालखी सोहळ्याचे मंगळवारी सायंकाळी पंढरीत आगमन होणार आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून निघालेल्या दिंड्या शहरात दाखल झाल्याने चंद्रभागेचे वाळवंट, प्रदक्षिणा रस्ता, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला आहे.

उन्हाच्या चटक्याने वारकरी त्रस्त
सोमवारी दिवसभर उन्हाची तीव्रता होती. उन्हापासून सुटका करण्यासाठी काही वारकरी लिंबाच्या फांद्याची चुंबळ डोक्यावर घेऊन दिंडीत सहभागी झाले. काहीजण पाण्यासाठी टँकरच्या मागे फिरत होते. दुपारी चार वाजता अचानक ढगाळ वातारण झाले. पाऊस पडला. या आनंदात वारकर्‍यांची पावलं झपझप निघाली. गारव्यामुळे दिवसभराच्या उकाड्याने त्रस्त झालेल्या वारकर्‍यांना दिलासा मिळाला.
पुढे वाचा - गजानन महाराजांची पालखी पंढरपुरात दाखल