आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठलाचे नित्योपचार पंढरीत सुरूच राहणार, २४ तास दर्शन नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - आषाढी यात्रा होईपर्यंत श्री विठ्ठलाचे नित्योपचार बंद ठेवण्याबाबत घेतलेला निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी (दि. २८) मागे घेतला. त्यानुसार श्री विठ्ठलाचा काढलेला पलंग ३ जुलै रोजी विधिवत पूर्ववत ठेवला जाईल. त्याच दिवशीपासून नित्योपचार पूर्ववत सुरू राहतील. मात्र, मंदिर २४ तास उघडे राहणार नाही. केवळ रात्री अडीच वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील.

विठुरायाची रात्रीची विश्रांती व दैनंदिन नित्योपचाराचा वेळ सोडून नेहमीप्रमाणे पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी सांगितले.

जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन घडावे, यासाठी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी २१ जूनपासून आषाढी यात्रेपर्यंत नित्योपचार बंद व मंदिर २४ तास उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला वारकरी सांप्रदाय पाईक संघासह हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध होता.

परंपरेनुसार आषाढी व कार्तिकी यात्रेच्या वेळी नित्योपचार बंद असतात. मात्र आषाढीला बराच अवकाश असताना घेतलेला हा िनर्णय परंपरेवर आघात करणारा असल्याचे वारकऱ्यांचे म्हणणे होते.

आषाढी, कार्तिकी, नवरात्रवेळी िवठ्ठलाचा पलंग काढला जातो. भाविकांच्या गर्दीमुळे नव्हे. मंदिर २४ तास उघडे ठेवण्यास विरोध नसल्याचेही त्यांचे म्हणणे होते. भाविकांनी याविरोधात दिलेल्या िनवेदनाची मंदिर प्रशासनाने दखल न घेतल्याने वारकरी सांप्रदाय पाईक संघासह हिंदुत्ववादी संघटना व महाराज मंडळींनी पंढरपूर बंद पुकारला हाेता, त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शासनाला देण्यात आला होता. दरम्यान, यात्रेवेळी वाद उद््भवू नये म्हणून राज्य सरकारनेही याची दखल घेतल्याचे सांगण्यात येत होते.
बातम्या आणखी आहेत...