आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन केंद्रीय मंत्री असूनही सोलापूर मागासलेलाच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर जिल्ह्यात शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे दोन केंद्रीय मंत्री असतानाही हा जिल्हा मागासलेला आहे. या दोघांनी काय विकास केला याचा लेखाजोखा सादर करावा. पराभवाचा अंदाज आल्यामुळे शरद पवार यांनी निवडणुकीतून पाय मागे घेतला, अशी टीका सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरूरकर यांनी केली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवानुभव मंगल कार्यालय येथे सकाळी 11 वाजता ‘कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, की शिवसेनेसाठी आयुष्यभर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कष्ट घेतले आणि शिवसेना उभी केली. त्यासाठी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी प्रत्येक शिवसैनिकाची आहे. म्हणूनच त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची सर्वांनी प्रतिज्ञा करणे अत्यावश्यक आहे. शिवरायांनी जसे मोगलांना नामोहरम केले होते तसेच शिवसैनिकांनी सत्ताधारी पक्षाची अवस्था करावी. सोलापूरचे वैभव परत आणण्यासाठी सोलापूरकरांनी शिवसेनेला साथ द्यावी, असे मत विश्वनाथ नेरूरकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, शहरप्रमुख प्रताप चव्हाण, कामगार नेते विष्णू कारमपुरी, महिला आघाडी प्रमुख अस्मिता गायकवाड, शांता जाधव, महेश धाराशिवकर, गणेश वानकर, पद्मा म्हंता, संजय कणके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

दिल्ली, मुंबईत भगवा फडकवा : नीलम गोर्‍हे
मुख्यमंत्र्यांना लकवा आला आहे, राष्ट्रवादी चकवा देत आहेत तर जनतेला थकवा आला आहे. शिवसैनिकांनी फक्त वेषभूषा करून चालणार नाही. मनाने शिवसैनिक होणे अत्यावश्यक आहे. देशगीतेबद्दल आस्था असणारी व्यक्तीच देशाचे नेतृत्व करू शकते. तसे कर्तृत्व नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात आहे. शिवसैनिकांनी दिल्ली आणि मुंबईमध्ये भगवा फडकवावा, असे आवाहन आमदार नीलम गोर्‍हे यांनी केले. यावेळी वॉर्डप्रमुखांना शिवसेनेचे फलक वाटप करण्यात आले.

बरडे, ठोंगे, शिवशरण पाटील एकत्र काम करा
भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याची आवश्यक ता आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आत्मसात करून काम करावे. तसेच पुरुषोत्तम बरडे, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, शिवशरण पाटील तुम्ही एकत्र काम करा, असा शब्दात आमदार नीलम गोर्‍हे यांनी चिमटा काढला. याबाबत विश्वनाथ नेरूरकर यांना विचारले असता, त्यांनी प्रथम गटबाजी नाही असे सांगितले. नंतर हसतहसत गटबाजी असल्याशिवाय मजा येत नाही, असे उत्तर दिले.

मनाने शिवसैनिक होणे अत्यावश्यक : आमदार नीलम गोर्‍हे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवानुभव मंगल कार्यालय येथे शनिवारी सकाळी 11 वाजता ‘कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित महिला कार्यकर्त्या.