आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गांधीजींवर चित्रपट काढला तर दाऊदलाही माफ करायचे का? - नीतेश राणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी असलेल्या अभिनेता संजय दत्तला शिक्षेत माफी का द्यायची? अतिरेकी कारवाया करणे किंवा त्यास मदत करणे हा देशद्रोहच आहे. उद्या दाऊद इब्राहिमने महात्मा गांधीजींवर चित्रपट काढला तर त्यालाही माफ करायचे का? कायद्याचे उल्लंघन आणि देशविघातक कृत्ये करणार्‍याना शासन झालेच पाहिजे,’ अशा शब्दात उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र व स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नीतेश यांनी संजय दत्तच्या माफीला विरोध केला.


स्वाभिमानी संघटनेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने सोलापुरात आले असता राणेंनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, तरुणाईच्या हाताला रोजगार देऊन समाजहित साधणे हेच संघटनेचे कार्य आहे. थापा न मारता प्रत्यक्ष कृती केलेली कधीही चांगली असते. मात्र काही नेते नवनिर्माणाच्या नावाखाली तरुणांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. त्यांना वेळीच रोखण्याची गरज आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना स्वागतासाठी इतके फटाके फोडू नका, असे राणेंनी कार्यकर्त्यांना सांगितले.

वाहिन्यांचे फंडे टीआरपीसाठी- आमदारांचे निलंबन आणि पोलिस अधिकार्‍याला मारहाण या प्रकरणावर बोलताना राणे म्हणाले, प्रत्येक गोष्टीला एक सीमारेषा असते. ती पार केली की शासन हे होणारच. एका वृत्तवाहिनीचे खिल्ली उडवणारे प्रतिनिधी वेगळेच तोंडसुख घेत आहेत. मी त्यावर ट्विटरवर भाष्यही केले आहे. केवळ वाहिनीचा टीआरपी वाढवण्याचे व स्वत:ला मोठे करण्याचे हे काम आहे. राखी सावंत स्वत:चे मार्केटिंग करण्यासाठी विविध फंडे वापरते त्यातला हा प्रकार आहे.

संजय दत्तची कृती गांधी विचारधारेची आहे काय? : निकम

भुसावळ- 'संजय दत्तने 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटातून गांधीजींचा विचार दिला आहे. त्यामुळे त्याला शिक्षा माफ करावी, असे विधान एका महाशयाने प्रसारमाध्यमांतून केले आहे. मात्र, त्याचं वागणं आणि त्याची कृती खरोखर गांधीजींच्या विचारधारेशी सुसंगत आहे काय?,' असा प्रश्न विशेष सरकारी वकील उज्‍जवल निकम यांनी उपस्थित केला आहे.

कुर्‍हे (ता.भुसावळ) येथील खान्देश वारकरी संप्रदाय अस्मिता संमेलनात ते बोलत होते. अँड. निकम म्हणाले की, संजय दत्तची शिक्षा माफ व्हावी, यासाठी आता बॉलीवूड एकवटले आहे. मात्र कायदा सर्वांसाठी सारखा आहे. आपल्या देशातील सांप्रदायिकता बिघडावी हा धर्मवेड्या लोकांचा विचार आहे. पाकिस्तानला आपल्याशी प्रत्येक युद्धात पराभव पत्करावा लागला आहे. कारण युद्धाचा प्रसंग उद्भवतो तेव्हा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा प्रत्येक राष्ट्राभिमानी नागरिक एकसंध भावनेने दक्ष राहतो.