सोलापूर - विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराला आता वेग आला आहे. पक्षप्रमुख, स्टार प्रचारक आता सोलापुरात येण्यास सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवारी मुक्कामी येत आहेत. सोमवारी उद्धव ठाकरे अन् केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी येत आहेत. कर्नाटकचे जलसंपदामंत्री एम. बी. पाटीलही रविवारी सोलापुरात येत आहेत.
उद्धव ठाकरेंची सभा
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी साडेसातला संगमेश्वर महाविद्यालय समोरील मैदानावर त्यांची सभा होईल, अशी माहिती जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी दिली. ठाकरे यांच्या जिल्ह्यात सहा सभा होणार आहेत. तुळजापूर येथून त्यांच्या दौऱ्यास प्रारंभ होईल. करकंब, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ येथेही त्यांच्या सभा होतील. शेवटची सभा सोलापूर शहरात आहे.
माकपसाठी वृंदा कारत
शहरमध्यचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या प्रचारासाठी पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या सदस्या वृंदा कारत, माजी खासदार सुभाषिनी अली येत आहेत. अली यांची सभा रविवारी न्यू पाच्छा पेठ परिसरात सायंकाळी साडेसहाला तर कारत यांची सभा सोमवारी मौलाली चौकात होणार आहे.
गडकरी जिल्ह्यात
केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी हेही सोमवारीच सोलापूरला येत असून, अक्कलकोटला दुपारी दोनला त्यांची जाहीर सभा होईल.शहरात त्यांच्या सभा नाहीत. अक्कलकोटची सभा झाल्यानंतर ते पुढच्या सभेसाठी निघणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी सांगितले.
कर्नाटकचे मंत्री सोलापुरात
कर्नाटकचे जलसंपदामंत्री विजापूरचे पालकमंत्री एम. बी. पाटील हे रविवारी सोलापुरात येत आहेत. दुपारी दीडला काँग्रेस भवनात शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा आढावा घेतील. सायंकाळी शहर उत्तर मतदारसंघातील कन्नड भाषिकांच्या परिसरात त्यांची जाहीर सभा घेण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू आहे.
पवार येणार मुक्कामी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार रविवारी सायंकाळी वाजता पुंजाल क्रीडांगणावर जाहीर सभेसाठी येत आहेत. शहर उत्तर, मध्य, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट मतदारसंघातील उमेदवारांसाठी ही सभा होईल. श्री. पवार सोलापूर शहरात येत आहेत; सभेनंतर ते सोलापूर मुक्कामी थांबतील. त्यांची सभा सोलापूरचा मुक्काम यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे.