आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीतेश राणेंच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - राजकीय नेते केवळ भावनिक मुद्दय़ांवर राजकारण करून लोकांची दिशाभूल करत आहेत. आश्वासनापलीकडे काहीच होत नसल्याने राजकीय नेत्यांच्या विश्वासर्हतेबद्दल जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तरुणांच्या हातांना काम देण्याऐवजी राजकारण्यांनी स्वार्थच साधला. यापुढे या तरुणांनी अशा स्वार्थी राजकारण्यांपासून सावध राहावे, असे आवाहन स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी बुधवारी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले सुभाष पाटील यांनी हुतात्मा स्मृती मंदिर येथे स्वाभिमान संघटनेच्या मेळाव्याचे आयोजन करून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिवशाही आणि स्वाभिमान संघटनेत करार झाल्यानंतर नीतेश राणे यांच्या सत्काराचे आयोजन करून कामगार नेते पाटील यांनी स्वाभिमान संघटनेमध्ये प्रवेश केला. तसेच त्यांची स्वाभिमान संघटनेचे शहर संघटक म्हणून त्यांनी निवड केली.
या वेळी स्वाभिमान संघटनेचे शहराध्यक्ष जयवंत कोकाटे, स्वाभिमानचे प्रवक्ते जगदीश बाबर, सर्मथ कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कळसकर आदी मान्यवर व्यासपीठावर होते. या वेळी शिवशाहीतील कर्मचार्‍यांच्या फरकाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरूपात उदय उत्तरकर आणि अशोक चौपडे या दोघांना 35 हजारांचा धनादेश देण्यात आला, तर निवृत्त कर्मचारी अशोक कुलकर्णी आणि सूर्यकांत बनसोडे यांनाही धनादेश देण्यात आला.
स्वाभिमान संघटनेचा रस्ता धरा - आजही अनेक पक्ष मराठीच्या मुद्दय़ावर आंदोलन करण्यास भाग पाडून तरुणांना चांगल्या नोकरीचे रस्ते बंद करत आहेत. तरुणांचा योग्य दिशा देण्याऐवजी केवळ राजकारणासाठी वापर करून घेतला जात आहे. याचा तरुणांनी विचार करावा आणि त्यांच्या भवितव्यासाठी काम करणार्‍या स्वाभिमान संघटनेचा रस्ता धरावा. मराठीच्या मद्दय़ावर राजकारण केले जाते, मात्र त्यांच्या आर्थिक प्रगतीकडे दुर्लक्ष केले जाते. मराठी माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही.
..म्हणून सोडला ‘मनसे’ - नवनिर्माण सेनेला कामगारांच्या हितापेक्षा राजकीय हित महत्त्वाचे वाटते. शिवशाही कामगारांच्या प्रश्नाविषयी वारंवार पाठपुरावा करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे ‘मनसे’ला रामराम ठोकण्याचे ठरविले. मला ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल आजही आदर आहे. मलासुद्धा ‘मनसे’ सोडताना खूप वाईट वाटले, मात्र कामगारांच्या हितासाठी ‘मनसे’ सोडल्याची कबुली सुभाष पाटील यांनी दिली.