आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध मुरूम उपशाबरोबरच अतिक्रमणाकडेही दुर्लक्ष; वन, महसूल पोलिसांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भंडार कवठे(ता. दक्षिण सोलापूर) येथील वनविभागाच्या ताब्यातील गायरान क्षेत्रातून वाळूमाफियांनी हजारो ब्रास मुरूम चोरल्याचे उघड झाले. त्याचबरोबर परिसरातील नागरिकांनी त्या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले असून त्याकडे वनविभाग प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने वन्यजीवांच्या अधिवासाला मोठा धोका निर्माण झाला आहे. चार महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या त्या प्रकरणाच्या चौकशीकडे वन महसूल प्रशासाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.

भंडारकवठे येथील गट क्रमांक ६८६-१ मध्ये चार हेक्टर, गट ६८६-२ मध्ये ७४.१० हेक्टर गायरान असून ते वनविभागाच्या ताब्यात आहे. सन १९९३ मध्ये झालेल्या भूकंपनानंतर गट ६८२-१ मधील चार हेक्टर क्षेत्रावर भंडारकवठे गावातील काही लोकांचे पुनर्वसन करण्यात आले.
आनंदनगर आंबेडकर नगरातील वसाहत त्या क्षेत्रात स्थापन झाली. पण वाटप झालेल्या क्षेत्राच्या पाचपटीपेक्षा अधिक क्षेत्रावर अतिक्रमण करण्यात आले. त्यामध्ये बांधकाम करून घरं वसवण्यात आली. तसेच पत्र्यांचे शेड उभारण्याबरोबर बागायत शेतीही तयार केली आहे. मुरुम चोरीप्रमाणेच वाढत्या अतिक्रमणाकडे वनविभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.

एक हेक्टरही झाडोरा नाही...

सन१९८० च्या दरम्यान महसूल विभागाने ७८ हेक्टर क्षेत्र वृक्षलागवडीसाठी वनविभागाच्या ताब्यात दिले. तेव्हापासून अाजपर्यंत त्या क्षेत्रावर एक हेक्टरही झाडोरा नाही, हे विशेष. त्यामुळे वनविभागाने वृक्षलागवडीसाठी मिळालेल्या क्षेत्रावर सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते. आेसाड माळरानावर वाढणाऱ्या विविध प्रजातींची गवतं हे त्या परिसरातील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाची असतात.

आजपर्यंत एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेकडो एकरावरील माळरानावर नैसर्गिक झाडोरा वाढविण्यासाठी ठोस प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे माळरानांवर आढळणारे काळवीटं, लांडगे, खोकड यासारख्या प्राणी त्या हद्दीतून स्थलांतरित झाल्याचे चित्र आहे. त्याचाच गैरफायदा वाळू माफियांनी घेतला. अख्खं माळरान उकरून त्यामधील मुरुम दगडं चोरल्याने संपूर्ण परिसर खड्ड्यांनी भरलाय. इतर क्षेत्रावर स्थानिकांसह काही स्वघोषित पुढाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे.

वन विभाग ठोस कारवाई करणार

भंडार कवठेतील वनविभागाच्या ताब्यातील गायरान क्षेत्रातून बेकायदा मुरुम उपसा प्रकरणाची कारवाई वनविभागातर्फे सुरूच आहे. पकडलेला पोकलेन एस. एस. लांडे पिरजादे यांच्या मालकीचा असल्याची माहिती आमच्याकडे आहे. वनक्षेत्रात झालेले नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे. संबंधितांनी पोकलेन परत मिळवण्यासाठी न्यायालयाकडे धाव घेतली; पण न्यायालयाने वन विभागाला त्याबाबतचा निर्णय घेण्यास सांगितले आहे. त्याबाबत ठोस कारवाई करण्यात येईल.” व्ही.व्ही. परळकर, साहाय्यक उपवनसंरक्षक

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा

वन क्षेत्रातूनमरूम उपशाची जबाबदारी कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर ढकलून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत:ची जबाबदारी झटकली. गेल्या ३५ वर्षांमध्ये गायरानावर झाडोरा वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, स्वत:च्या कार्यक्षेत्रातील अतिक्रमण थोपविणे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही कर्तव्य आहेच.
उपवनसंरक्षक, साहाय्यक उपवनसंरक्षकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात फिरणे बंधनकारक आहे. जर ते फिरले असते, तर त्यांना अतिक्रमण, मुरुम उपसा झाल्याचे दिसले कसे नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर जबाबदारी झटकून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न वनविभागात सुरू असल्याचे चित्र आहे.