आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकर नाही बँकांत, सोने चोरांच्या खिशात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांमध्ये ठेवीची रक्कम दिल्याशिवाय लॉकर मिळत नाही. त्यासाठीही प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे धनिकांकडील सोने घरात आणि नंतर चोरांच्या खिशात जाण्याचे प्रकार मोठय़ा संख्येने वाढले. गेल्या वर्षात सुमारे 400 तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची नोंद पोलिसांकडे झाली आहे.
बहुतांश मोठय़ा बँकांच्या शाखांमध्ये सेफ डिपॉझीट लॉकर्सची सुविधा आहे. परंतु ती र्मयादित असल्याने सगळ्यांनाच मिळत नाही. सहकारी बँकांमध्येही लॉकर्स आहेत. तिथे ठेवीची सक्ती नाही; परंतु दोन ते तीन वर्षांचे भाडे आगाऊ द्यावे लागते. 50 ते 60 तोळे घरात ठेवणार्‍या मध्यमवर्गीयांना व्याजासह परतावा मिळणार्‍या ठेवीची अट नको आहे. त्यापेक्षा घरातच ब्रॅण्डेड कपाट घेण्याकडे कल वाढला. परंतु असे कपाटही चोर सहजपणे उघडत आहेत.

सव्वा कोटींचे सोने चोरीस
गेल्या वर्षात झालेल्या चोर्‍यांमध्ये 400 तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली. सध्याचा दर प्रती तोळे 30 हजार रुपये प्रमाणे 1 कोटी 20 लाख रुपयांच्या सोन्याची चोरी झाली आहे. यातील चोरही सापडलेले नाहीत.

काय असते लॉकर?
बँकेचे ठिकाण, त्याची इमारत, परिसर या बाबी तपासून बँका लॉकरची सुविधा देतात. तळघरात सुरक्षिततेचे उपाय योजून लहान आणि मोठय़ा आकारातील लॉकर ग्राहकांना उपलब्ध करून देतात. त्यासाठी 20 ते 25 हजार रुपयांची ठेव ठेवावी लागते. शिवाय वार्षिक भाडे हजाराच्या घरात असते. लॉकरमध्ये ग्राहक काय ठेवतो याच्याशी बँकेचे देणे-घेणे नसते. परंतु त्या लॉकरची एक चावी मात्र बँकेकडेच असते. दुसरी चावी ग्राहकाच्या हाती. या दोन्ही चाव्या एकाच वेळी लावून फिरवल्या तरच लॉकर उघडू शकते. त्यामुळे चावी सांभाळणे खूप महत्त्वाचे. हरवल्यास 5 हजार रुपयांचा खर्च येतो. ती हरवल्यास लॉकर यंत्रणा देणार्‍या संबंधित कंपनीचा तंत्रज्ञ येऊन चावी तयार करतो. ग्राहकासमक्ष उघडतो.

‘एसबीआय’चे लॉकर सध्या फुल्ल
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये सध्या जागा नाही. शाखा विस्तारात ही सुविधा देण्याचे प्रयत्न होईल. शहरात बँकेच्या आणखी काही शाखा प्रस्तावित आहेत. तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. लॉकर्सच्या आकाराप्रमाणे किमान एक हजार रुपये भाडे आहे.’’ ज्ञानेश्वर गुट्टे, विभागीय अधिकारी स्टेट बँक

1. शहरातील एकूण 17 बँकांमध्ये लॉकर्सची सुविधा
2. एका लॉकरमध्ये लहान, मोठे 75 बॉक्स असतात
3. शहरात सुमारे 4 हजार खातेदार लॉकर वापरतात
4. सुमारे 10 हजार ग्राहक बँकांतील लॉकरच्या प्रतीक्षेत