आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो पॉलिथीन प्लास्टिक कप, कँटीनचालकाने चहासाठी दिली स्टीलची किटली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्लास्टिक पिशव्या आणि कपांतून चहा पिण्याचे घातक परिणाम जाणून येथील एका कँटीन चालकाने तातडीने कागदी कप सुरू केले. परंतु परिसरातील दुकानदार अजूनही प्लास्टिक पिशव्यांतून चहा घेऊन जात आहेत. त्यांनी स्टीलची किटली आणावी, अशी सूचना वारंवार करूनही दखल घेतली जात नाही. ही समस्या दूर करण्यासाठी कँटीनचालकाने कायम ग्राहक असणाऱ्या ५० दुकानदारांना किटली देण्याचा निर्णय घेतला. शिवाय कँटीनच्या दर्शनी भागात प्लास्टिकचे परिणाम दर्शवणाऱ्या बातम्यांचे फलकही उभे केले आहे.
पूर्वभागातील दत्तनगरात सरगम कँटीनचे चालक नागेश सरगम यांनी ‘नो पॉलिथीन’चा उपक्रम हाती घेतला. प्लास्टिक कप आणि पिशव्या पूर्णत: बंद करण्याच्या निर्धाराने त्यांनी स्टील किटली स्वत:च्या खर्चातून देण्याचे मान्य केले. ग्राहक हेच दैवत असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल, असे ते म्हणाले. चवदार चहा मिळण्याचे ठिकाण म्हणून त्यांच्याकडे ग्राहकांची मोठी गर्दी असते. त्यांना जलद सेवा देण्यासाठी प्लास्टिक कप वापरत होते. शिवाय पार्सलसाठी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर व्हायचा.
‘दिव्य मराठी’ने त्याचे परिणाम विशद केल्यानंतर श्री. सरगम यांनी तातडीने कागदी कपांतून चहा देण्यास सुरुवात केली. आता त्यांनी स्टीलची किटली देण्याची तयारी दर्शविली.
पूर्वभागातील दत्तनगरातील सरगम कॅटीनच्या दर्शनी भागात प्लास्टिकचे परिणाम दर्शवणाऱ्या बातम्यांचे फलक लावण्यात आले आहे.

उंदरांवरील प्रयोगातून सिद्ध

प्लास्टिक कपांमध्ये घातक रसायने आढळून येतात. उकळता चहा अशा प्लास्टिक कपांमध्ये ओतल्यास ‘बिस्फेनॉल-ए’ घटक स्थलांतरित होण्याचा वेग ५५ पटींनी वाढतो. ‘बिस्फेनॉल-ए’ हा घटक मानवी रक्तात मिसळत राहिल्यास कॅन्सरला हे आमंत्रण देण्यासारखे ठरेल.

प्लास्टिक पूर्ण बंद

कँटीनमध्ये प्लास्टिक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वत:च्या खिशातील पैसे खर्चाची तयारी आहे. आरोग्यपूर्ण सेवा हीच ग्राहक सेवा आहे.'' नागेश सरगम, कँटीन चालक