आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक डब्यांना विराम, स्टील डब्यांनाच मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पर्यावरण आणि मानवी जीवनावर घातक परिणाम करणाऱ्या प्लास्टिकला पूर्णविराम देणाऱ्या अनेक गोष्टी घडून येत आहेत. विद्यार्थी प्लास्टिक डब्यातून गरम अन्नपदार्थ शाळेला घेऊन जातात. त्याने मुलांच्या आरोग्यावर कसे परिणाम होतात, हे ‘दिव्य मराठी’तून प्रसिद्ध झाले. त्यानंतर स्टीलच्या डब्यांना मोठी मागणी वाढली. नावीन्यपूर्ण प्लास्टिकचे डबे आले तरी त्याला फारसा प्रतिसाद नसल्याचे विक्रेते म्हणाले.
‘पर्यावरण आणि आरोग्यपूर्ण शहरासाठी’ नो पॉलिथीनची हाक ‘दिव्य मराठी’ने दिली. त्याला अनेक शाळांनी प्रतिसाद दिला. शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रार्थना झाल्यानंतर मुख्याध्यापकांनी स्टीलच्या डब्यातून जेवणाचे डबे आणण्याची सूचना केली. त्याबाबत काही पालक तक्रारीसाठी आले. त्यांना त्यांच्याच मुलांवर प्लास्टिकचे परिणाम कसे होतात, हे सांगितले. त्यानंतर पालकांनी लगेच स्टीलचे डबे घेतल्याचा अनुभव मुख्याध्यापकांनी सांगितला. प्लास्टिकमुक्त शाळा करण्याचा िनर्धारही काही मुख्याध्यापकांनी केला.
स्टीलचे डबेच मागतात
- गेल्या अनेक वर्षांपासून प्लास्टिकचे डबे बाजारात येत आहेत. परंतु यंदा मात्र स्टीलच्या डब्यांना मागणी वाढली. ती लक्षात घेऊन स्टीलचे नावीन्यपूर्ण डबे आणले. त्याला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.”
श्रीनिवास कुंदूर, नवी पेठेतील विक्रेते
का नको प्लास्टिक डबे
प्लास्टिक डब्यांमध्ये गरम भाज्या, पोळी ठेवल्यानंतर रासायनिक विघटन होते. एका संशोधनात ‘बिस्फेनॉल-ए’, ‘थॅलेट’ आणि ‘डायऑक्सिन’ या रसायनांचा विशिष्ट डोस उंदरांना टोचल्यावर त्यांच्यात कॅन्सरचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले. प्लास्टिकमध्ये ही घातक रसायने आढळून येतात. गरम भाज्या प्लास्टिक डब्यांमध्ये ठेवल्यास ‘बिस्फेनॉल-ए’ घटक स्थलांतरित होण्याचा वेग ५५ पटींनी वाढतो. ‘बिस्फेनॉल-ए’ हा घटक मानवी रक्तात मिसळत राहिल्यास कॅन्सरला हे आमंत्रण देण्यासारखे असते.
पालकही सकारात्मक
- स्टीलचे डबे आणण्याविषयी सूचना केल्यानंतर काही पालकांनी याबाबत विचारणा केली. त्यांना प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगितले. पालक जागरुक झाले. मुलांच्या हातात आता स्टीलचे डबे दिसत आहेत.”
सुनील व्हसाळे, उपमुख्याध्यापक, विद्यानिकेतन
बातम्या आणखी आहेत...