आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे विद्युतीकरणाची अद्याप निविदाच नाही; रेल्वे प्रशासनाचे मात्र मौन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर रेल्वे विभागातील मनमाड ते वाडी दरम्यानच्या विद्युतीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. मात्र, निविदा न निघाल्याने दौंड ते सोलापूर व सोलापूर ते गुलबर्गा या रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाच्या कामास अद्याप प्रारंभ होऊ शकलेला नाही. निविदा का निघाली नाही, हे रेल्वे विभागाने स्पष्ट केलेले नाही.

सोलापूर विभागात सध्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने आशियाई बँकेकडून 1600 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. विद्युतीकरणाचे एकूण काम तीन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात मनमाड ते दौंडचा समावेश आहे. मनमाडपासून सुरू झालेले विद्युतीकरणाचे काम आता दौंडजवळ आलेले आहे. याचे उर्वरित काम फेब्रुवारी 2014 पर्यंत होणार आहे. तसेच दुसर्‍या टप्प्याच्या कामासही प्रारंभ झाला आहे. दुसर्‍या टप्प्यामध्ये दौंड ते पुणे व गुलबर्गा ते वाडी समाविष्ट आहे. सोलापूरकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला दौंड ते सोलापूर ते गुलबर्गा या कामाच्या निविदाच प्रसिध्द झालेल्या नाही. त्यामुळे येथे अद्याप कामास प्रारंभ झालेला नाही.
विद्युतीकरणाचा फायदा कोणता : सध्या सोलापूर स्थानकावरून होणारी रेल्वे वाहतूक ही डिझेल इंजिनद्वारे होते. विद्युतीकरणामुळे इलेक्ट्रीक इंजिन रेल्वेस जोडले जातील. त्यामुळे गाड्यांचा वेग वाढेल. प्रवासाचा वेळ वाचेल. डिझेल इंजिनमुळे होणारे हवेचे प्रदूषण टाळता येईल. तसेच गाड्यांच्या संख्येतही वाढ होणार आहे.


विद्युतीकरण व दुहेरीकरण कामाच्या निविदा कामाच्या टप्प्यानुसार निघाल्या आहेत. कामाचा पहिला टप्पा मनमाड ते दौंड असा होता. त्यानुसार त्याच्या निविदा प्रसिद्ध झाल्या. दौंड ते सोलापूरसाठी निविदा काढण्याचे काम सुरू आहे. निविदा प्रसिद्ध होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.’’ सुशील गायकवाड, वाणिज्य व्यवस्थापक

दौंडहून पुढे लोकल शक्य
दौंड ते पुणे दरम्यान विद्युतीकरणाचे काम सुरू झाले आहे. पुणे ते मुंबई मार्गावर यापूर्वीच विद्युतीकरण झाले आहे. विद्युतीकरण झाल्यास पुण्याची लोकल दौंडपर्यंत येणे सहज शक्य होईल.