आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Vehicle Day In Solapur ZP On Every Month First Saturday

महिन्याच्या पहिल्या शनिवारी आता झेडपीत नो व्हेईकल डे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत सकाळी नेहमी शासकीय वातानुकूलित वाहनांतून अधिकारी येतात. कर्मचारी स्वत:च्या खासगी वाहनांवरून येतात. पण, बुधवारचा दिवस त्यास अपवाद ठरला.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह प्रमुख खातेप्रमुख शहराच्या मध्यवर्ती रस्त्यावरून चक्क सायकलवरून झेडपीत आले अन् कार्यालयतील कामकाज संपल्यानंतर सायकलवरून घरी गेले. अनेक कर्मचारी स्वत:च्या वाहनांवरून येण्याऐवजी सार्वजनिक वाहनातून झेडपीत आले. त्यानिमित्त किमान २०० लिटर इंधनाची बचत झाली. जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनासाठी सुखद सुरुवात झेडपीने केली.
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत पर्यावरण संवर्धनासाठी एक दिवस सायकलीचा वापर करण्याचे आवाहन केले होते. त्यास जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. २२) जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने कृतिशील प्रतिसाद दिला. वसुंधरा दिनानिमित्त ‘नो व्हेईकल डे’ साजरा करण्याचे आवाहन सीईओ काकाणी यांनी केले होते. शहराच्या विविध भागातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महापालिका परिवहनच्या बससेची सोय करण्यात आली होती.

सकाळी नऊ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी काकाणी सायकलवरून जिल्हा परिषदेकडे निघाले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. बनसोडे, कृषी विकास अधिकारी मदन मुकणे, मुख्य लेखा वित्त अधिकारी गौतम जगदाळे, भारत मिशनचे कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र अहिरे हे सायकलवरून कार्यालयात आले. जिल्हा परिषदेच्या प्रवेशदारातून फक्त सायकलला प्रवेश देण्यात आला. झेडपी कर्मचाऱ्यांना घेऊन आलेली महापालिका परिवहन समितीच्या बस थेट काँग्रेस भवनासमोर थांबल्या.

पदाधिकाऱ्यांचा घेणार सहभाग

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी झेडपीमध्ये ‘नो व्हेईकल डे’ अभियान राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

लाभार्थींना केले सायकलींचे वाटप

दक्षिण सोलापूर तालुक्यातील लाभार्थींना जिल्हा परिषदेच्या महिला- बाल कल्याण समाज कल्याण विभागातर्फे वैयक्तिक लाभ योजनेतून सायकलींचे वाटप मुख्य कार्यकारी अधिकारींच्या हस्ते करण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. बनसोडे, गटविकास अधिकारी गहिनीनाथ चव्हाण, विरोधी पक्षनेते शिवानंद बिराजदार, सदस्य सुरेश हसापुरे, सदस्य महादेव पाटील, समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले आदी.

२०० लिटर इंधनाची बचत

एक दिवस वाहनाचा वापर केल्यामुळे किमान २०० लिटर इंधनाची बचत झाली. तसेच, त्या इंधनाच्या वापरामुळे होणारे प्रदूषणही थांबण्यास मदत झाली. मुख्यालयात ४०० कर्मचारी आहेत. खातेप्रमुखांसह कर्मचाऱ्यांच्या वाहनांमध्ये प्रत्येक किमान एक लिटर पेट्रोल किंवा डीझेलची बचत झाली. तसेच, सार्वजनिक वाहन किंवा सायकलीवरून आल्याने अवतीभोवतीच्या किमान एखाद्या सामाजिक प्रश्नाची जाणीव काहीजणांना निश्चितच झाली असणार, असे मुख्य कार्यकारी अधिकारी काकाणी यांनी सांगितले.

काही कर्मचाऱ्यांची पाठ

‘नो व्हेईकल डे’ राबविण्याबाबत झेडपी प्रशासनाने खातेप्रमुख कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन नियोजन केले होते. सर्वांनी त्यास प्रतिसाद देण्याची तयारी दर्शविली. पण, प्रत्यक्षात काही कर्मचारी खासगी वाहनाने आले. प्रवेशदाराच्या समोरील रस्त्यावर वाहनं लावून ते झेडपीत कार्यरत होते. काही कर्मचाऱ्यांनी दक्षिण उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या आवारात वाहनं लावून अभियानाकडे पाठ फिरवली.

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त "स्वच्छ सोलापूर, हरित सोलापूर' जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांनी सायकल रॅली काढली. काही जण बस, रिक्षा चालत कामावर आले. कर्मचाऱ्यांच्या सोईसाठी परिवहनतर्फे बसची व्यवस्था करण्यात आली होती.