आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Women Protection, Ignorance To The Vishaka Committee

महिला संरक्षणाचे ‘विशाखा’ अस्त्र नावालाच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महिलांच्या संरक्षणासाठी तसेच त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी अस्त्र म्हणून जन्माला आलेल्या विशाखा समितीचे अस्तित्व नावालाच उरले आहे. शहरातील बहुतेक शासकीय-निमशासकीय कार्यालयात कार्यरत असणार्‍या महिला अधिकारी व कर्मचार्‍यांना अशा प्रकारची महिला अत्याचार प्रतिबंधक समिती असते याचीच माहिती नाही. या समितीविषयी जागृती नसल्याने शोषणाला वाचा फुटत नसल्याची स्थिती आहे. तक्रारी दिसून येत नसल्या तरी घुसमट मात्र आहे.या संवेदनशील विषयावर टाकलेला प्रकाशझोत.

समिती गठित झाल्या,काम मात्र नाही
शहरातील ज्या कार्यालयात समित्या स्थापन झाल्या आहेत, तिथे बैठकाच होत नाहीत. झाल्या तरी त्या आटोपशीर होतात. शिवाय समितीत काम करणार्‍या व्यक्तींना या समितीचे नेमके काम काय आहे? याची पूर्ण माहिती नाही. तर काही महाविद्यालयात केवळ नावाला समिती गठित केली आहे. त्यावर काम करणार्‍या मान्यवर व्यक्तीही कधी समितीकडे फिरकत नाहीत आणि विद्यार्थिनींनाही समितीची माहिती नसल्याने तक्रारी नोंदवल्या जात नाहीत
महिलांनी चुप्पी सोडणे गरजेचे
या समितीच्या कामासाठी मुळात महिला व युवतींमध्ये विशाखा म्हणजे काय याची माहिती होणे गरजेचे आहे. या समितीच्या अंतर्गत महिलांसाठी काय अधिकार आहेत याची महिती मिळणे गरजेचे आहे. परंतु आपल्यावर होणार्‍या अत्याचारांची माहिती ही गुप्तपणे विशाखा समितीकडे मांडण्याचे काम महिला व युवतींनी केले पाहिजे तरच याचा खरा उद्देश पूर्ण होणार आहे.
तक्रारी नसल्यातरी, घुसमट मात्र दिसते
यंदाच्या वर्षात विशाखाच्या माध्यमातून एकही के स दाखल झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. महिला अधिकार्‍यांचे राहणीमान, बोलणे तसेच स्टाईलवरून टिंगलटवाळी करणे, अश्लील हावभाव करणे, महिलांच्या निर्णय क्षमतेबद्दल शंका व्यक्त करणे आदी प्रकार सहन करताना महिला कर्मचारी व अधिकारी दिसतात. पोलिस स्टेशनपर्यंत प्रकरण गेले तर बदनामी होईल या भीतीने महिला अशा तक्रारी करण्यापेक्षा शोषण सहन करतात.
असा झाला जन्म विशाखाचा
1997 साली राजस्थानमध्ये एका गावात भवरीदेवी नावाच्या समाजसेविकेने एका सरपंचाच्या मुलाचा बाल विवाह थांबवला होता. त्याचा राग धरून त्या सरपंचाने या समाजसेविकेवरच सामूहिक बलात्कार केला. या गंभीर घटनेची तीव्र प्रतिक्रिया देशभरात उमटली. दिल्लीच्या सेवाभावी संस्थांनी एकत्र येऊने उंबरठय़ाबाहेर पडणार्‍या महिलांच्या संरक्षणासाठी समिती नेमावी, असे सर्वोच्च न्यायालयात अपिल केले. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे महिला संरक्षणासाठी समिती नेमण्याचे आदेश दिले. तेव्हापासून देशभरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयात विशाखा समिती स्थापन झाली
समितीला आहेत कारवाईचे अधिकार
शासकीय, निमशासकीय कार्यालयातील महिलांवर वरिष्ठाकंडून तसेच सहकारी कर्मचार्‍यांकडून होणारे अत्याचार रोखण्याचे काम या समितीमार्फत होते.महिला कर्मचार्‍याकडून तक्रार आल्यास व्यवस्थापकीय तत्त्वावर ही समिती शिक्षा करते. त्रास देणार्‍या पुरुष कर्मचारी कामावरून कमी करण्यापासून त्याला समज देण्यापर्यंतचे अधिकार समितीला आहेत.
सोलापुरात मात्र वानवाच
सोलापुरात विविध महाविद्यालये, शाळा आणि कर्मचारी संघटनांच्या ठिकाणी विशाखा समिती काही प्रमाणात गठित झालेल्या आहेत. शहरातील अनेक शासकीय विभागात समितीचे अस्तित्व नाही.तसेच महिलांचे लैंगिक छळ होऊ नये याबाबत दक्षता घेतली जात नाही.सोलापुरात जिल्हा सत्र न्यायालयात लेखनिकांसाठी विशाखा समितीचे गठन झाले आहे. अनेक महाविद्यालयांत याची स्थापना झालेली आहे. सोलापूरच्या लोकसंख्येच्या तुलनेने 10 टक्के कार्यालयातच विशाखा स्थापित आहे.उर्वरित 90 टक्के कार्यालयात समितीच नाही.
कशी गठित होते ही समिती
महिला कर्मचारी असणार्‍या कार्यालयात विशाखाची स्थापना होणे गरजेचे आहे.कार्यालयातीलच काही महिला व एक बाहेरचे कायदे तज्ज्ञ, एक किंवा दोन सामाजिक कार्यक र्ते मिळून समिती तयार केली जाते. महिला अधिकारी तसेच कर्मचार्‍यांकडून आलेल्या तक्रारी अर्जावर चौकशी करून ही समिती आपले निर्णय देते.
या ठिकाणी असावी विशाखा
शासकीय, निमशासकीय कार्यालयात, खासगी संस्था, सेवाभावी संस्था, संघटना, बँका, पाटबंधारे खाते, वनविभाग, कॉल सेंटर्स, कार्पोरेट सेक्टर, इस्पितळे, शाळा, महाविद्यालये, पोलिस मुख्यालय, एस.टी. खाते, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महिला व बालकल्याण कार्यालय, माहिती कार्यालय या व अशा विविध कार्यालयांत ही समिती गठित होणे आवश्यक आहे.
विशाखा समितीचे कार्य दुर्लक्षित
समितीकडे तक्रारी करा

एका प्राध्यापकाने आपल्या सहकारी प्राध्यापिके वर वाईट टीका केल्याची तक्रार समितीकडे केली होती. याची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची विशाखाने कारवाई केली आहे. हे विशाखा समितीच्या माध्यमातून शक्य झाले आहे. अँड. नीला मोरे, विशाखा समिती मार्गदर्शक
प्रत्येक कार्यालयात विशाखा हवी
महिला अत्याचार व शोषण रोखण्यासाठी विशाखा समिती हे प्रभावी अस्त्र आहे.अशा प्रकारची समिती प्रत्येक कार्यालयात गठित होणे गरजेचे आहे. तिच्या माध्यमातून अनेक महिलांना न्याय मिळू शकतो. सारिका तमशेट्टी, युवती संचालिका चाईल्ड लाइन संस्था.
विशाखा समितीच्या कार्यासाठी निवड करण्यात आलेल्या व्यक्तींची निवड कुणाच्या सांगण्यावरून केली जाते. तसेच या समित्याकडून दबावाखाली काम केले जाते. शिवाय काही प्रकरणे ही व्यवस्थित न हाताळता ती दडपली जातात. सर्वच कार्यालयात विशाखाचे महत्त्व गांभीर्याने घेतले जात नाही प्रीती श्रीराम, सदस्य,विशाखा समिती सदस्य,पोलिस आयुक्तालय