आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सिव्हिल’ सेवेसाठी नव्हे कॉलेजसाठी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- छत्रपती शिवाजी रुग्णालय (सिव्हिल) हे वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी आहे. ते लोकांना सर्व वैद्यकीय सुविधा देऊ शकत नाही. वाढती लोकसंख्या, आरोग्य सेवा पुरवण्यात महापालिकेला आलेले अपयश पाहता सोलापूरसाठी स्वतंत्र शासकीय रुग्णालय गरजेचेच आहे, असे मत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केले.

केंद्र सरकारची राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य सुविधा (एनआरएचएम) राष्ट्रीय शहरी आरोग्य सुविधा (एनयूएचएम) या दोन्हीचा लाभ सोलापूरच्या सिव्हिलला मिळत नाही. व्हॅक्सीन किंवा त्यासारखी अनेक इंजेक्शन उपलब्ध करणे किंवा काही आॅपरेशन्स करणे शक्य होत नाही. महापालिका दवाखाने, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, आरोग्य केंद्रे यांना निधी मिळत आहे. सिव्हिल राज्य सरकारच्या उच्च तंत्र वैद्यकीय शिक्षण विभागाकडे असल्याने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचाही काही संबंध राहिलेला नाही. स्वतंत्र रुग्णालय झाले तर वैद्यकीय सेवेसाठी भरपूर निधी उपलब्ध होऊ शकतो.

महापालिका देऊ शकत नाही सेवा
सोलापूरमहापालिकेचे एकूणच उत्पन्न घटले आहे. भविष्यातही ते वाढू शकेल असे दिसत नाही. त्यामुळे ज्या महापालिकात उत्पन्न नाही, पण दरडोई उत्पन्नही कमी आहे, तेथे स्थानिक यंत्रणेला (मनपाला) आरोग्य सेवा देणे कठीण होणार आहे. महापालिका आरोग्य सेवेतून अंग काढून घेईल असे दिसते. दुसरीकडे शहरांची वाढती लोकसंख्या पाहता आरोग्य सेवेची शासकीय यंत्रणा वाढवण्याची गरज दिसू लागली आहे. सध्या महापालिका दवाखान्यांत डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. यंत्रसामग्री नाही, त्यामुळे रुग्णसेवेचा मोठा ताण शासकीय यंत्रणेवरच येणार आहे.

पाठपुरावा करण्याची गरज
मेडिकलकॉलेज असलेल्या शहरात दुसरे स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचे शासनाचे धोरण आहे. तसे सोलापूरलाही होऊ शकते. नांदेड, कोल्हापूर, नाशिक, नागपूर येथे झाले आहे, असेही डॉ. पोवार यांनी सांगितले.