सोलापूर - मी आतापर्यंत सात लोकसभा आणि सात विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. एकदाही पराभव झाला नाही. जनतेची कामे केली. पण यापुढे मी सत्तेतील कोणतेही पदे स्वीकारणार नाही. राज्यात राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळावे म्हणून जनतेकडून अपेक्षा करीत आहोत. राष्ट्रवादी राज्याचे नेतृत्व करू शकते. आमच्याकडे असे अनेक चेहरे असे आहेत, जे राज्याला नेतृत्व देऊ शकतात, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला.
सोलापुरात पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पवार म्हणाले, राज्यात काही ठिकाणी आमची लढत भाजप, शिवसेना, काँग्रेससोबत आहे. १४४ जागांची मागणी करून त्यानुसार तयारी केली. ऐनवेळी २८८ जागा लढणे अवघड आहे, अशी कबुली त्यांनी दिली. प्रत्येक राज्याने औद्योगिक विकास केला पाहिजे. पण त्यासाठी त्यांनी इतर राज्यातील उद्योगधंदे, प्रकल्प, योजना पळवू नये, असे मत व्यक्त केले.
राज्यातील निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी व्हावी म्हणून दोन महिन्यांपूर्वी मी
सोनिया गांधीना भेटलो. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पण राज्यातील नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे आघाडी तुटली, असा आरोप त्यांनी केला. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, महेश गादेकर, मनोहर सपाटे, आमदार दिपक साळुंके, विद्या लोलगे, दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.