आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटरीला आता ‘नो’; कायद्याच्या चौकटीत होणार हस्तांतरण-नोंदणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरात सध्या नोटरीद्वारे मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री होत आहे. त्या नोटरीद्वारे महापालिकेत हस्तांतरण आणि नोंदणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. हे काम नियमांना डावलून केले जात असल्यामुळे उशिरा का होईना महापालिकेने या कामाला ब्रेक दिला आहे.

जागेची खरेदी झाल्यानंतर त्या जागेचे हस्तांतरण करताना खरेदीदस्त महापालिकेत दाखविणे अत्यावश्यक आहे. खरेदी दस्त आणणे म्हणजे शासनाच्या नियमानुसार मुद्रांक शुल्क भरलेला असतो. मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे महापालिकेत हस्तांतरण करताना खरेदी दस्त आणण्याच्या अटी लावल्या जातात. असे असतानाही महापालिकेत अनेक वर्षांपासून खरेदी दस्तची अट बाजूला ठेवून नोटरीद्वारे नोंदणी करून घेऊन हस्तांतरण केले जात होते. यामुळे महापालिकेला उत्पन्न मिळत असले तरी ते चुकीच्या पध्दतीने होत हेाते.

नोटरीची पध्दत बंद करण्याचा निर्णय महापालिकेने दोन दिवसांपूर्वी घेतला आणि ज्यांनी नोटरीद्वारे नोंदणी केली आहे तसेच करणार आहेत अशांना जाहीर प्रसिध्दीकरणाद्वारे आवाहन केले आहे. यापूर्वी महापालिकेने 1998 च्या सुमारास असाच निर्णय घेतला होता. दोन वर्षापर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, 2000 च्या सुमारास पुन्हा नोटरीद्वारे नोंदणी करण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. हा निर्णय घेताना नगर रचना विभागाचा अभिप्राय घेण्याची अट घालण्यात आली. परंतु आजतागायत या अटीची अंमलबजावणीच झाली नाही. फक्त नोटरीद्वारे नोंदणी होईल इतक्याच शब्दाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्यात आली.

बिगर शेती करून न घेताच नोटरीद्वारे खरेदी-विक्री सुरूआहे. यामुळे त्या भागात फसवणुकीचे प्रकार जास्त प्रमाणात होत आहेत. रस्त्याची जागासुध्दा हडप केली जात आहे. त्यामुळे बिगर शेती करून घेणे अत्यावश्यक बनले आहे. नोटरीद्वारे असो किंवा रीतसर खरेदी-विक्री केलेली असो, महापालिकेत नोंदणी करताना नोंदणी शुल्क एक हजार रुपये आकारले जाते. हस्तांतरण करण्यासाठी खरेदीची जेवढी रक्कम असेल त्याची पाच टक्के रक्कम शुल्क म्हणून आकारण्यात येते. नोटरीद्वारे नोंदणी बंद केल्यामुळे महापालिकेचे उत्पन्न घटेल. नागरिकांची फसवणूक थांबेल.

वरातीमागून घोडे
नोटरीद्वारे नोंदणी आणि हस्तांतरण करण्याचा प्रकार पूर्वीपासूनच आहे. ज्या त्या वेळीच महापालिकेने असा प्रकार बंद करायला हवा होता. महापालिकेची भूमिका ही नेहमी वरातीमागून घोडे, अशीच आहे.’’ रोहिणी तडवळकर, विरोधी पक्षनेते