आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now, Ahead Of The BJP City Officer Selecton And Pick balancing Challenge

शहर भाजपपुढे आता पदाधिकारी निवडीचे अन् संतुलनाचे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी पुन्हा एकदा आमदार सुभाष देशमुख यांची आणि शहराध्यक्ष म्हणून प्रा. अशोक निंबर्गी यांची वर्णी लागली. देशमुख यांच्या कामाचा आवाका पाहिला तर त्यांना ग्रामीणचीच जबाबदारी सोपवण्यात आल्याचे दिसते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विश्वासातील प्रा. निंबर्गी यांना शहराध्यक्षपद मिळाले असले तरी पक्षांतर्गत संतुलन राखत इतर पदाधिकारी निवडताना त्यांची कसोटीच लागणार आहे.
पालकमंत्री झाल्यावर आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्वत:ला शहराध्यक्षपदातून मुक्त करण्यासाठी पक्षाला कळवले. त्यानंतर आठ महिन्यांनी प्रा. निंबर्गी यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. निंबर्गी यांच्याकडे संघटन कौशल्य आहे. तरीही पक्षातील नाराज गटाला सोबत घेऊन काम करण्यात त्यांची कसोटी लागेल. इतर पदाधिकारी निवडताना संतुलन साधावे लागेल.
इकडेही द्यावे लागेल लक्ष
गेल्या तीन वर्षांपासून शहर भाजपा महिला आघाडी अस्तित्वातच नाही. भाजपमध्ये नगरसेविकांची संख्या जास्त आहे, तरीही महिला आघाडीचे पदाधिकारी जाहीर झाले नाही. अध्यक्षांना याकडेही लक्ष द्यावे लागेल.
विरोधी पक्षनेता निवडीचे आव्हान
विरोधी पक्षनेता कृष्णहरी दुस्सा यांनी प्रकृतीचे कारणामुळे मागील वर्षी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रभारीपद पांडुरंग दिड्डी यांच्याकडे आहे. या पदासाठी इंदिरा कुडक्याल, संजय कोळी, नरेंद्र काळे यांच्यासह अन्य इच्छुक आहेत.
जातींचाही करावा लागेल विचार
प्रा. निंबर्गी यांच्या निर्णयावर पालकमंत्री देशमुख यांचा प्रभाव राहणार आहे. त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातील. दोन सरचिटणीस आणि इतर पदाधिकारी निवड करताना जातीचे समीकरण ध्यानात घेऊन संतुलन साधावे लागेल.
आधीच्या पदावर नियुक्ती
आमदार सुभाष देशमुख यांचा मुलगा रोहन यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यावेळी सुभाष देशमुख यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केला होता. आता त्यांची त्याच पदावर नियुक्ती झाली आहे. वास्तविक आमदार देशमुख हे मंत्रिपदाचे दावेदार होते. त्यांना पक्ष संघटनेत स्थान दिले आहे.

महिना अखेरपर्यंत निवडी
- आता तूर्तास प्रभागांतील पोटनिवडणुकीकडे लक्ष आहे. रिक्त असलेली विविध पदे या महिनाअखेरपर्यंत भरण्याचा प्रयत्न करणार आहे.
प्रा. अशोक निंबर्गी, भाजप शहराध्यक्ष