आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता डोळे तपासणीनंतरच मिळणार ड्रायव्हिंग लायसन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - वाहन चालवण्याचा परवाना काढण्यासाठी डोळ्यांची तपासणी अनिवार्य करण्याचे सोलापूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ठरवले आहे. डोळ्यांतील दोषांमुळे अपघात झाल्याची नोंद कुठेच नसते. अशा अपघातांची संख्याही अतिशय नगण्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासंबंधीची कोणतीही आकडेवारी नसताना संपूर्ण महाराष्ट्रात केवळ सोलापुरातच या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत याची कार्यवाही सुरूही झालेली असेल. यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येत आहे.
दुचाकी किंवा चारचाकी वाहनांसाठी लागणार्‍या शिकाऊ व कायमस्वरूपाच्या वाहनचालक परवान्यासाठी डोळे तपासणी सक्तीची असली तरी यात तारतम्य असणार आहे. पस्तीशीच्या आतील तरुणांना कारण नसताना तपासणीसाठी खोळंबून ठेवण्यात येणार नाही. मात्र, अधिक वय असणार्‍यांना मात्र तपासणीशिवाय परवाना दिलाच जाणार नाही. यामुळे अपघातांची संख्या कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे म्हणणे आहे. नेत्र तज्ज्ञ डॉ निरंजन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी करण्यात येईल. सोलापूर कार्यालयातून शिकाऊ आणि कायमस्वरूपाचे मिळून रोज दोनशे ते अडीचशे परवाने दिले जाते.
याची होणार तपासणी - रंगआंधळेपणा, दूरचे आणि जवळचे दिसण्यात काही दोष आहे का याची तपासणी होणार असून वाहनचालक दोषी आढळल्यास त्याचा परवाना रद्द होईल. या तपासणीच्या वेळी एड्सबाबत प्रबोधन होण्यासाठी माहितीपत्रके आणि निरोधाचे मोफत वाटप करण्यात येईल.
लोकांनी पुढाकार घ्यावा - शारीरिक व्यंग सहज दिसून येते, मात्र डोळ्यांतील दोष ध्यानात येत नाही. त्यामुळेच हा नवा उपक्रम सुरू केला. लायसन काढण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती आमच्या कार्यालयातून दिली जाते. लोकांनी रांगेत उभारण्याचा कंटाळा करून एजंटांची मदत घेऊ नये. यासाठी टोकन पद्धत सुरू केली आहे. लोकाभिमुख होण्याचा प्रयत्न आहे. लोकांनीही यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.’’ अनिलकुमार वळीव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी