सोलापूर - सोलापूर शहर पोलिस दलाने शुक्रवारी ‘सोलापूर सिटी पोलिस’ संकेतस्थळाचे उद्घाटन करून लोकाभिमुखता जपण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले. पुणे, मुंबई या मोठ्या शहरापेक्षाही एक पाऊल पुढे ठेवत पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी संकेतस्थळाचे उद्घाटन केले. सोलापूरकरांना आपली तक्रार आता ऑनलाइन पद्धतीने पोलिसात नोंदवता येणार आहे. 72 भाषांमध्ये आपल्याला माहिती मिळणार असल्याचा दावा आहे.
सातही पोलिस ठाणे, वाहतूक व गुन्हे शाखेत दररोज दाखल होणा-या गुन्ह्यांची माहिती, रेकॉर्डवरील चोरांची माहिती, मिसिंग अथवा बेवारस मृत पावलेल्या व्यक्तींची छायाचित्रे व माहिती संकेतस्थळावर राहील. पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याबद्दल काही तक्रार असल्यास ती नोंदवण्याची सोयही संकेतस्थळावर आहे. ऑनलाइन फिर्याद दिल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी आपल्याला संपर्क करून गुन्ह्याची अधिक माहिती घेतील. या सर्व सुविधांमुळे पोलिसांना आता अपडेट राहावे लागेल. तसेच नागरिकांनाही पोलिस ठाण्यात जाण्याची तसदी घ्यावी लागणार नाही. पोलिसांच्या अरेरावी भाषेलाही सामोरे जावे लागणार नाही. आयुक्तालयाची ही वेबसाइट (पोलिस-नागरिक संवाद) नागरिकांना दिलासा देणारी ठरणार आहे.
ड्रीम केअर डेव्हलपर्सतर्फे चार विद्यार्थ्यांनी मिळून हे संकेतस्थळ बनवले आहे. यानिमित्त गौरव देशपांडे, विवेक गांगजी, राहुल लांडगे, रोहित मेंगजी यांचा व आर्यन क्रिएशनतर्फे डीव्हीडी तयार करणा-या सचिन जगताप यांचा सत्कार श्री. रासकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे, पी. आर. पाटील उपस्थित होते. निरीक्षक संदीप गुरमे यांनी सूत्रसंचालन केले.
महत्त्वाचे ठळक मुद्दे
०कुठलीही व्यक्ती वेबसाइटवर थेट फिर्याद देऊ शकते
०गोपनीय माहिती देऊ शकता, तुमचे नाव गुप्त राहील
०
गुगल,
फेसबुकला कनेक्ट असल्यामुळे वेबसाइट मोबाइल अॅप्सवर उपलब्ध आहे
०पोलिस ठाण्याची माहिती मॅपवरून शोधता येते, अधिकारी व त्यांचा संपर्क क्रमांकही मिळेल
०दैनिक दाखल गुन्हे, प्रेसनोट, मिसिंग गुन्हे, चोरांची माहिती
०डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट सोलापूरसिटीपोलिस.जीओव्ही.इन
पोलिसांची जबाबदारी वाढली
वेबसाइट अपडेट राहील. नागरिकांना बसल्याठिकाणी माहिती मिळेल. कामात सुसूत्रपणा येईल. पोलिसांचे काम वेळेवर होईल. नागरिकही दक्ष राहतील. महिला, तरुणींना पोलिस ठाण्यात न जाता तक्रार देता येईल.’’ प्रदीप रासकर, पोलिस आयुक्त
वाहतूक शाखेची माहिती देऊ
वाहतूक जॅम, रस्ता कुठे बंद आहे. एकेरी मार्ग, सिग्नल बंद, वाहतूक शाखेशी संबंधित काही माहिती अपलोड करण्याचा प्रयत्न राहील.’’ मोरेश्वर आत्राम, सहायक आयुक्त, वाहतूक
दहशतवाद रोखण्यासाठी जनजागृती
दशहतवाद रोखण्यासाठी जनजागृती करणारी डीव्हीडी तयार करण्यात आली आहे. मंदिर, बसस्थानक, रेल्वेस्थानक, चित्रपटगृह, मॉल, शाळा, महाविद्यालय, गर्दीची ठिकाणे, सिटीबस व सार्वजनिक ठिकाणी वावरताना काय काळजी घ्यावी याबाबत यातून माहिती दिली जाईल. चित्रपटगृह, सार्वजनिक कार्यक्रम, कॉलेजात ही डीव्हीडी दाखवण्यात येईल. जेणेकरून नागरिक सावध राहून काळजी घेतील.’’ खुशालचंद बाहेती, सहायक आयुक्त
पोलिसांवरही राहील वचक
वाहतूक पोलिसाने आपल्याला कुठल्या कलमाखाली दंड केला, दंडाची रक्कम किती याची माहितीही संकेतस्थळावर आहे. कुणी पोलिस जास्त पैसे मागत असतील तर तुम्ही थेट तक्रार नोंदवण्याचीही सुविधा आहे. पोलिस दंड केल्यानंतर पावती देतात. तो पावती क्रमांक तुम्ही प्रतिक्रिया म्हणून अपलोड करू शकता. त्यावरून तुम्हाला दिलेली पावती व पोलिसांकडील पावती यात साधर्म्य आहे की नाही हे पाहता येईल. थोडक्यात पारदर्शकपणे काम राहील.
www.solapurcitypolice. gov.inवर नोंदवा तक्रार