आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावकारांकडून होणारी पिळवणूक आता थांबणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-सावकारांकडून होणारी लुबाडणूक थांबवण्यासाठी राज्य शासनाने नवीन सावकारी अध्यादेश 2014 लागू केला आहे. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांना खासगी सावकारांवर कारवाई करण्यापासून ते शेतजमिनीचे व्यवहार रद्द करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. कायद्याच्या अंमलबजावणीच्या सूचना राज्य शासनाकडून मिळताच सर्वत्र लागू करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

लावंड म्हणाले,‘‘शेतकरी व शेतमजूर आर्थिक गरज भागवण्यासाठी सावकाराकडून कर्ज घेतात. सावकारी पाशातून मुक्त होऊ न शकल्याने राज्यात काही शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. सावकारांकडून होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी पूर्वी मुंबई सावकारी अधिनियम 1946 नुसार प्रयत्न व्हायचे. पण, त्या कायद्यातील तरतुदी पुरेशा व प्रभावी ठरत नसल्याने सावकारांकडून होणारी पिळवणूक चालूच आहे. शेतकर्‍यांची मालमत्ता हडप करणे, कर्जावर अवास्तव दराने व चक्रवाढ पद्धतीने व्याज घेण्यावर निर्बंध येत नव्हते. पण, नवीन अध्यादेशान्वये जिल्हा उपनिबंधकांना कलम 16 नुसार अवैध सावकाराच्या ताब्यातील मालमत्ता व जमीन ताब्यात घेण्याचा, चुकीचे व्यवहार रद्द करण्याचा अधिकार मिळाला आहे. तसेच, दिवाणी न्यायालयास असलेले न्यायिक अधिकारही त्यांना मिळालेत. त्यामुळे खासगी सावकरांकडून होणारी लुबाडणूक, दमदाटी किंवा इतर प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे, लावंड यांनी सांगितले.
परवान्यासाठी इच्छूक सावराकाराने सहाय्यक निबंधकांकडे अर्ज करावा. नमूद कार्यक्षेत्रातच त्याने व्यवसाय करणे बंधनकारक आहे.कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणे, अर्जदार दोषी आढळल्यास जिल्हा उपनिबंधक परवाना रद्द करू शकतात.

ग्रामसभेत वाचन

येत्या 26 जानेवारीला गावनिहाय होणार्‍या ग्रामसभांमध्ये या नवीन सावकारी अध्यादेशाचे वाचन करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व 1030 गावांसाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये 730 विविध कार्यकारी सेवा सोसाट्यांचे सचिव, 150 जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी, 150 लेखा परीक्षण कार्यालयातील कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. यामध्ये तालुक्यांचे सहाय्यक निबंधक, शहर उपनिबंधक व जिल्हा उपनिबंधक हे सुद्धा ग्रामसभेला हजेरी लावून कायद्याची माहिती देणार आहेत.