सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्याचे राज्य सरकारचे धोरण स्वागतार्ह आहे. पण या आरक्षणातून केंद्र सरकारचे कोणतेच फायदे मिळणार नाहीत, त्यामुळे ओबीसीत समावेश झाला पाहिजे, यासाठी आता आमचा लढा राहील. अर्धी लढाई आम्ही जिंकली आहे, अर्धी लढाई सुरू करणार आहोत असे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी सांगितले.
तुळजापूरला दर्शनासाठी जाण्यासाठी मेटे हे रविवारी सायंकाळी सोलापुरात आले होते. मुंबईला जाण्यापूर्वी शासकीय विर्शामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘मराठा समाजाची लोकसंख्या 35 टक्के आहे. त्यामुळे आम्ही 25 टक्के आरक्षण मागितले होते. नारायण राणे समितीने 20 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती. मुख्यमंत्र्यांनी चर्चेनंतर 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला. ओबीसीमध्ये समावेश करा असे आम्ही म्हटले होते. कारण या वेगळया प्रवर्गामुळे केंद्र सरकारच्या नोकर्या, केंद्रीय शाळा आदी ठिकाणी काही लाभ मिळणार नाही. सरकारमधीलच काही मंत्र्यांचा मराठा समाजाला ओबीसीत समावेश करण्याला विरोध होता. त्यांच्या दबावातूनच राणे समितीने केलेली शिफारसही फेटाळली गेली. हे आरक्षण जाहीर केले असलेतरी सरकारलाही त्याचा लाभ होणार नाही. स्वतंत्र प्रवर्ग आम्हाला मान्य नाही. त्यामुळे थेट ओबीसीत समावेश करावा यासाठी लढाई राहील. त्यासाठी पुन्हा महाराष्ट्रभर फिरणार आहे.’’
जागा वाटपात तेढ असली तरी महायुती टिकेल
महाराष्ट्रात महायुतीत जागा वाटपावरून तेढ निर्माण होत आहे, याकडे लक्ष वेधले असता जागा वाटपावरून महायुती तुटणार नाही. कारण आघाडी सरकार घालविण्यासाठीच महायुती तयार झाली आहे. त्यासाठीच आम्ही एकत्र राहणार आहोत. दोन, चार जागांमुळे काहीही फरक पडणार नाही, असे उत्तर मेटे यांनी दिले.