आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनटीपीसीला गती: प्रकल्प उभारणीची कामे युद्धपातळीवर सुरू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- फताटेवाडी (दक्षिण सोलापूर) येथे एनटीपीसीच्या कोळशापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारणीला गती आली असून मार्च 2016 पासून प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू होणार आहे. काम पूर्ण होण्यासाठी कोणतीही अडचण नाही, अशी माहिती प्रकल्प सरव्यवस्थापक प्रदीप बेहेरे यांनी शुक्रवारी दिली.

केंद्र सरकारच्या ऊर्जा खात्यामार्फत फताटेवाडी, आहेरवाडी परिसरात नऊ हजार 395 कोटी 18 लाख रुपये खचरून 660 मेगावॉट वीजनिर्मितीच्या दोन युनिटचा प्रकल्प तत्कालीन ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पुढाकाराने 2008 मध्ये मंजूर झाला. त्याचा पायाभरणी समारंभ केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आला. एकूण 1,852 एकरांत या प्रकल्पाची उभारणी होणार आहे. त्याचे काम वेगाने सुरू आहे. त्याबाबतची माहिती देण्यासाठी प्रकल्प स्थळावर शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी र्शी. बेहेरे यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कोणताही अडथळा नाही. एनटीपीसी ही स्वतंत्र कंपनी असून, मंत्री बदलले तरी मंजूर झालेल्या प्रकल्पावर कोणताही परिणाम होत नाही. 19 मार्च 2012 रोजी प्रकल्पाच्या खर्चाला अंतिम मंजुरी मिळाली आणि तेथून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यानंतर 2 जून 2012 रोजी सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते मेन प्लँटचा प्रारंभ करण्यात आला. गेल्या सहा महिन्यांत प्रकल्पाचे काम वेगाने सुरू झाले. सध्या प्रकल्प स्थळावर बॉयलर, कूलिंग वॉटर प्लँट, स्कूल, वसाहत, पाणीपुरवठा पाइपलाइन व इतर कामे वेगाने सुरू असल्याची माहिती बेहेरे यांनी दिली.

ओडिशातून कोळसा
कोळसा ओडिशा येथील महानदी कोल फील्ड कंपनीकडून घेतला जाणार आहे. तेथे कोळसा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. या कोळशाच्या दर्जाचा विचार करूनच प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे.

परिसरातील तापमान रोखणारी यंत्रणा
या प्रकल्पामुळे परिसरातील तापमान वाढेल अशी शंका घेतली जात आहे. मात्र, ती चुकीची असून, सुपर क्रिटिकल मशिनरी वापरल्याने 50 ग्रॅमपेक्षा जास्त कोळशापासूनचे धुळीचे कण हवेत पसरणार नाहीत. राज्यातील अन्य प्रकल्प जुने आहेत, तेथे प्रत्यक्षात 150 ते 250 ग्रॅमपर्यंतच्या कोळश्याचे धुळीचे कण असल्याने तापमान वाढत आहे. पण सोलापुरात तसे होणार नाही आणि शेतजमीनही खराब होणार नाही. ऑनलाइन एअर पोल्युशन कंट्रोल मॉनिटरिंगच्या तीन सिस्टिम उभारल्या जाणार आहेत. तेथे सातत्याने नोंदी असतील, असे बेहेरे यांनी सांगितले.

वीजपुरवठय़ाचे करार
सोलापुरातील प्रकल्पातून होणार्‍या 1200 मेगावॉट विजेचा पुरवठा करण्यासाठी विविध राज्यांशी करार झाले आहेत. महाराष्ट्राला 556.75, मध्य प्रदेशला 304.63, छत्तीसगडला 121.60, गोवा राज्याला 21.77, दमण दीवसाठी 7.52, दादरा नगर हवेलीसाठी 10.73 मेगावॉट वीज एनटीपीसी प्रकल्पाद्वारे दिली जाणार आहे. या वाटपानंतर 198 मेगावॉट वीज शिल्लक राहणार आहे. ती महाराष्ट्र राज्याला वापरता येऊ शकते.

उजनीचे दोन टीएमसी पाणी
प्रकल्पासाठी लागणारे पाणी आणण्यासाठी उजनीहून 120 किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात येत आहे. त्यासाठी लागणारी 860 एकर जमीन घेण्यात आली आहे. ही जमीन शेतकर्‍यांकडून संपादित केली असली तरी पाइपलाइन टाकल्यानंतर ती जमीन पुन्हा शेतकर्‍यांना वापरण्यासाठी देण्यात येणार आहे. दोन टीएमसी पाणी साठवण्यासाठी दोन टँक (पंप हाऊससह) तयार करण्यात येत आहेत. सोलापूर शहरासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तिसर्‍या पाइपलाइनच्या 250 कोटी रुपयांच्या खर्चाला एनटीपीसीच्या सामाजिक उत्तदायित्त्व प्रकल्पाअंतर्गत मंजुरी मिळाली आहे. त्या कामाचे मक्ताही आता निघणार आहे. या प्रकल्पामुळे तापमान वाढणार नाही, जमीन खराब होणार नाही आणि राखही पसरणार नाही.

276 मी.ची चिमणी
प्रकल्पासाठी महत्त्वाचा भाग असलेल्या बॉयलर (चिमणी) उभारणीचे काम अद्ययावत तंत्राने सुरू आहे. 276 मीटर इतक्या उंचीचे ते असेल. हे काम हिताची येथील बीजीआर एनर्जी कंपनीला देण्यात आले आहे.