आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांना निलंबित करा, नागेंचे शालेय शिक्षण सचिवांना निवेदन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पोषणआहारात द्यावे लागणारे मेन्यू महापालिका शाळा क्रमांक-7 मधील विद्यार्थ्यांना आठ महिन्यांपासून मिळालेले नाही. याप्रकरणी बचत गटावर कारवाई करण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणात आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी याच शाळेतील निलंबित मुख्याध्यापक कैलास नागे यांनी एका निवेदनातून शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या सचिवांना केली आहे. विशेष म्हणजे, या निवेदनाची प्रतिलिपी त्यांनी आयुक्तांनाही दिली आहे.
शालेय शिक्षण सचिवांना दिलेल्या निवेदनात कैलास नागे यांनी म्हटले आहे की, शाळेला पोषण आहार पुरवण्याचे कंत्राट योगीराज महिला बचत गटाला देण्यात आले आहे. नियमानुसार कंत्राटदाराने आठवड्यातून एकदा बिस्कीट, चिक्की अथवा राजगुऱ्याचे लाडू देणे बंधनकारक आहे. परंतु, बचत गटाने जानेवारी २०१३ च्या शेवटच्या आठवड्यापासून पूरक आहार दिलेला नाही. विद्यार्थ्यांना पूरक आहार मिळावा, या हेतूने मी याबाबत आयुक्तांकडे विद्यार्थी दर गुरुवारी बिस्किटाची मागणी करत असल्याचे निवेदन दिले. परंतु, आठ महिने होऊनही विद्यार्थ्यांना गोड घास मिळालेला नाही, तर संबंधित बचत गटाने मुख्याध्यापकांनी तांदूळ दिल्याचे खोटे पत्र दिले. प्रशासनाने मला याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र, बचत गटांना कोणतीही नोटीस बजावली नाही. यामागे काय कारण दडले आहे, हा चौकशीचा विषय आहे. चिमुकल्या मुलांना पोषण आहार आठ महिन्यांपासून वंचित ठेवल्याप्रकरणी निलंबित करण्यात यावे विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निलंबित मुख्याध्यापक कैलास नागे यांनी केली आहे.
निलंबितअसताना शिक्क्याचा वापर : कैलासनागे यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या छतावरील उतरत्या टिनावर साफसफाईकरिता चढवल्याबद्दल २६ सप्टेंबरला निलंबित करण्यात आले आहे. परंतु, निलंबनाच्या काळातही त्यांनी या निवेदनावर मुख्याध्यापक म्हणून स्वाक्षरी केली आहे, तसेच शाळेच्या शिक्क्याचा वापर केला आहे.
तक्रारीत तथ्य नव्हते
पोषणआहाराबाबत मुख्याध्यापकांनी यापूर्वी केलेल्या तक्रारीची चौकशी केली आहे. या चौकशीत कोणतेही तथ्य आढळून आले नाही. तसेच मार्चमध्ये केलेल्या तक्रारीबाबत आता तक्रार करण्यात काहीही अर्थ नाही. उलट लहान मुलांना साफसफाईसाठी उतरत्या टिनावर चढवल्याप्रकरणी मुख्याध्यापक कैलास नागे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे आयुक्तांच्या निलंबनाची मागणी हा हास्यास्पद प्रकार आहे.'' अनिलबिडवे, महापालिकासर्वशिक्षा अभियान
प्रदीप चोरेंचे नरमाईचे धोरण
निलंबनाच्याकाळात शाळेच्या शिक्क्याचा वापर हा गंभीर गुन्हा आहे. याबाबत उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी प्रशासन अधिकारी प्रदीप चोरे यांना मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. परंतु, प्रशासन अधिकारी उपायुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून निलंबित मुख्याध्यापकांबाबत नरमाईचे धोरण स्वीकारले आहे, अशी चर्चा सुरू आहे.