आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर ओबीसींना धर्माशी फारकत घ्यावी लागेल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - इतर मागासवर्ग हिंदू धर्माचे पालन करतो. सर्व सणवार साजरे करतो. परंतु या धर्माचे ठेकेदार मात्र त्यांच्या हिताच्या आड येतात. त्यामुळे या धर्माशी फारकत घेऊन धर्मांतर करावे लागेल, असा इशारा ओबीसी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत उपरे यांनी शनिवारी येथे दिला. दुसर्‍या राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलनाचे उद्घाटन येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते.

43.8 टक्के मागास हिंदू तर 8.4 टक्के मागास अल्पसंख्याक असल्याचा अहवाल केंद्राकडे आहे. काका कालेलकर आयोगाच्या शिफारशी धूळखातच पडून होत्या. मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. संसदेने मंजूर केलेल्या या शिफारशींवर न्यायपालिकेने धोरण ठरवले. हा घटनेचा अवमान आहे. याबाबत बुद्धिजीवी बोलत नाहीत. त्यांच्या साहित्यातून मांडत नाहीत. त्यामुळे आता बंडाची गरज आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नातसून नीता होले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार, महापौर अलका राठोड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. निशिगंधा माळी, स्वागताध्यक्ष युवराज चुंबळकर, मुख्य निमंत्रक प्रा. राजन दीक्षित, रिपब्लिकन पक्षाचे नेते राजा सरवदे, राजा इंगळे, लक्ष्मण गायकवाड, माजी आमदार निर्मला ठोकळ, ज्येष्ठ कविवर्य डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली आदी उपस्थित होते.

सुफींनी मानवतावाद दिला : डॉ. नदाफ
तेराव्या शतकात अस्पृश्यता निर्माण झाली. माणसाचे माणूसपण हिरावून घेण्याचे प्रकार सुरू झाले. अशा विषमतेच्या काळात सुफी संतांनी मानवतावाद दिला. त्यांच्या समतेच्या शिकवणुकीमुळे अनेक मागास जाती इस्लाम धर्मात गेल्या. तलवारीच्या जोरावर धर्मांतर घडवून आणल्याचा इतिहास लिहिला गेला, तो खोटा आहे. धर्मांतराला केवळ विषमता, अस्पृश्यता हेच कारण होते, असे ख्यातनाम शाहीर डॉ. अजीज नदाफ यांनी सांगितले.

ओबीसी साहित्य संमेलनातील परिसंवादात ते बोलत होते. ‘ओबीसी संत, सुफी संप्रदाय साहित्यातील मानवतावाद व विद्रोह’ हा परिसंवादाचा विषय होता. अध्यक्षस्थानी डॉ. नदाफ होते. धनाजी गुरव, मोहन देशमाने सहभागी होते.
डॉ. नदाफ म्हणाले, ‘‘मोहंमद पैगंबरांनी समानतेची शिकवणूक दिली. इस्लाम धर्माचा प्रसार केला.’’

साईबाबा सुफी संतच
कमीत कमी कपडे आणि साहित्य घेऊन जगणाराच खरा फकीर होऊ शकतो आणि सुफी संप्रदायात फकिराचे काम मोठे असते. शिर्डीचे साईबाबा अशाच अवस्थेतून जगले. त्यांच्या डोक्याला हिरव्या रंगाचे कफन होते. ‘सबका मालिक एक’ असा त्यांचा संदेश होता. परंतु आज साईबाबांच्या डोक्याला भगवे कापड बांधून त्यांचा संदेश पुसून काढण्यात आला. त्यांचेही भगवेकरण करण्यात आल्याचे गुरव यांनी सांगितले.

कोण काय म्हणाले.?

राज्यात सर्वत्र दुष्काळ आहे. परंतु मंदिरांमध्ये कुठेच दुष्काळ नाही. सोन्या-रत्नांनी मढवलेल्या मूर्ती दिसतील. वाड्या-तांड्यांवर मात्र भूकेलेली मुले आहेत. समाजातील हा विरोधाभास कमी व्हावा.’’ महापौर अलका राठोड

जाता जात नाही, ती जात असते. या जातीच्या वाट्याला अन्याय आणि अत्याचारच येत असतात. त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्व मागास जाती एकत्र आल्या पाहिजेत.’’ डॉ. निशिगंधा माळी, जिल्हा परिषद अध्यक्षा

माणसाला स्वत:च्या कर्मावर विश्वास नाही. कर्माच्या भीतीने तो मंदिरात जातो आणि देवालाही पापात सहभागी करून घेतो. धर्मव्यवस्था विभागली गेल्याने त्याच्या मूळ अर्थाचा विपर्यास झाला आहे.’’ किशोर कटारे, उद्योगपती

पुणे विद्यापीठाला महात्मा फुले यांचे नाव द्या!
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात चालवलेल्या शाळेची दुरवस्था झाली आहे. ती दूर करून तेथे राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी आंदोलन करावे लागले. शेवटी मुख्यमंत्र्यांना स्मारकाचा निर्णय घ्यावा लागला. त्याच धर्तीवर आता पुणे विद्यापीठाला ज्योतिबांचे नाव देण्यासाठी आंदोलन करणार असून, त्याला समस्त ओबीसींना पाठिंबा द्यावा, असे नीता होले म्हणाल्या.

फुलेंच्या मार्गावर जाणार
विद्या, मती, गती आणि वित्त देणार्‍या फुलेंच्या मार्गावरच आम्ही जाणार आहोत. फुले यांच्या जोडीला मार्क्‍स घेऊ; र्शमिक बलुतेदारांचे प्रश्न मांडणारे ओबीसी लेखक निर्माण करू. इतिहासाला प्रश्न विचारून त्याचे पुनर्लेखन करू. त्या सगळ्यांची साहित्य अकादमी सुरू करू. सारासार विवेकाने विचार करणार्‍या समाजाची निर्मिती करू, असे संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार यांनी सांगितले.

‘सत्यशोधक’ पुरस्कार देऊन झाला गौरव
या वेळी सामाजिक, शैक्षणिक, उद्योग आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा सत्यशोधक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. माजी महापौर डॉ. भीमराव जाधव गुरुजी (शिक्षण), अनिल वाघाडकर (सामाजिक), डॉ. अजीज नदाफ (साहित्य), किशोर कटारे (उद्योग), रंजना कोल्हे (आदर्श माता), एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे आणि सिंहगड इन्स्टिट्यूटचे संजय नवले यांचा गौरव झाला. सौ. होले आणि डॉ. कुंभार यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले.

शरद यादवांचा एसएमएस
या संमेलनाच्या उद्घाटनासाठी जनता दलाचे (संयुक्त) अध्यक्ष खासदार शरद यादव येणार होते. परंतु ‘दिल्लीतील महत्त्वाच्या घडामोडींमुळे येऊ शकणार नाही’ असे सांगून त्यांनी संयोजन समिती सदस्य प्रदीप ढोबळे यांच्या मोबाइलवर शुभसंदेश पाठवला. त्यात म्हटले आहे, की इतर मागासांच्या प्रश्नांवर विचारांची घुसळण करण्यासाठी संमेलन घेता, ही आनंदाची गोष्ट. राममनोहर लोहिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इतर मागासांचा विचार मांडला. परंतु त्यानंतर प्रभावी असा कृती कार्यक्रम झालाच नाही. अशा संमेलनातून ते अपेक्षित आहे.

धम्माशिवाय पर्याय नाही : गायकवाड

जातीविरहित समाजाच्या उभारणीसाठी आणि समताधिष्ठित भारताच्या निर्मितीसाठी बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी केले. सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलनाच्या हिंदू ओबीसींचा मूळ धर्म, ग्रंथ व गुरू कोणता? परिवर्तन आणि विपर्यास या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अँड. ओमप्रकाश मौर्य, शशिकांत चव्हाण यांचा सहभाग होता.

धम्म श्रेष्ठ मार्ग : अँड. मौर्य : बुद्धांचा धर्म हा श्रेष्ठ मार्ग आहे. अन्य सर्वच धर्मांत वर्गव्यवस्था आणि जातिव्यवस्था आहेत. मात्र, बौद्ध धर्मात असे नाही. त्यामुळे बौद्ध धर्मा जगात व्यापलेला आहे. देशात बौद्ध धर्म प्रस्थापित करून त्यांची शिकवण लोकांना देणे आवश्यक आहे.

वैचारिक क्रांतीसाठी एकत्र या : डॉ. चव्हाण : सध्या धर्माच्या नावावर दलाली होत आहे. मोठय़ा मंदिरांमध्ये एवढी संपत्ती कुठून आली? याचा विचार करण्याची गरज आहे. हा पैसा आपल्या समाजबांधवांनीच दिलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारांना बळी न पडता एका नवीन वैचारिक क्रांतीसाठी एकत्र यावे, असे डॉ. शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.