आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओडिशाच्या कंपनीत लटकले शहरातील शेकडो गोरगरीब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मूळची ओडिशा राज्याची मायक्रो फायनान्स कंपनी सोलापुरातील साखर पेठेत अकरा वर्षापासून कार्यरत आहे. पिग्मीच्या माध्यमातून लोकांना साडेनऊ टक्के व्याजदराने पैसे गुंतवण्यास सांगितले. सुमारे दोनशे जणांनी यात पैसे गुंतवले होते. मागील पंधरा दिवसांपासून पिग्मी एजंट आल्याने गुंतवणूकदार संभ्रमात पडले. साखर पेठेतील कार्यालयात चौकशी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे मिळाली. चौकशीत ओडिशातील कंपनीचे व्यवहार सीबीआयने थांबवल्याची माहिती मिळाली.

बुधवारी दुपारी शंभर-दोनशे गुंतवणूकदार जमले. जेल रोड पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्वांंना पोलिस ठाण्यात आणले. नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची अठरा हजारांची फसवणूक झाली आहे. त्यांच्यासह दोनशे जणांची एकत्रित फिर्याद आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतली आहे. ६७ लाख ५८ हजार १९० रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन झाले आहे. हा आकडा कोट्यवधीच्या घरात जाणार आहे. मॅनेजर प्रिलोचन एपल्ली (रा. ओडिशा), कार्यालयीन कर्मचारी सत्यनारायण दासरी, संतोष जल्ला, राजू गड्डम (रा. सोलापूर) यांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू आहे.

ग्राहक मंचात जाऊ शकता
फसवणूक झाली असल्यास ग्राहक मंचात दाद मागता येते. पैसे राष्ट्रीयीकृत बँकेतच गुंतवणे चांगले. अथवा जेथे गुंतवणूक करणार आहोत त्याची पूर्ण माहिती घ्या. जास्त पैशाच्या आमिषापेक्षा रक्कम सुरक्षित कशी राहील हे महत्त्वाचे.
अ‍ॅड.पी. बी. लोंढे-पाटील

प्राथमिक चौकशी
साखरपेठ कार्यालयातील कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. प्राथमिक चौकशीत फसवुणकीचा आकडा कोट्यवधीच्या घरात जाण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हे शाखा अधिक माहिती घेत आहे.
- अरुणदेवकर, सहाय्यक निरीक्षक, जेल रोड

२००४ पासून ही कंपनी कार्यरत
साखरपेठेत ही कंपनी २००४ पासून कार्यरत आहे. सुमारे पाच हजारांहून अधिक सभासद आहेत. शंभर, दोनशे, पाचशे, हजार रुपये महिन्याकाठी पिग्मी घेण्यात येत होती. बारा ते पंधरा पिग्मी एजंट सोलापुरात कार्यरत होते. संपूर्ण शहरातून पैसे जमा करण्यात येत होते. ओडिशातील ही कंपनी आहे.

गरीब महिलांची केली फसवणूक
कोनापुरेचाळ, फॉरेस्ट, नई जिंदगी, विडी घरकुल, साखर पेठ या भागातील सुमारे पाच हजार महिला या फायनान्समध्ये दररोज वीस रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत पिग्मी भरत होते. काही लोकांना गरजेनुसार तीन-पाच हजार रुपये कर्जही देण्यात येत होते. शिलाई कामगार, विडी कामगार, धुडी भांडी करणाऱ्या महिलांनी यात पैसे गुंतवले आहेत. या सर्वांची फसवणूक झाल्यामुळे सौ. फुलारे यांनी पोलिस आयुक्तांना फोन करून घटनेची माहिती दिली. जेल रोड पोलिसांना कारवाई करण्याची सूचना दिल्यानंतर फिर्याद घेण्यात आली.
मायक्रो फायनान्स कंपनीच्या मॅनेजरसह चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी बुधवारी ताब्यात घेतले आहे.

साखर पेठ पोलिस चौकीत फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
पुढील स्लाईडवर पाहा, कोण आहेत आरोपी...