आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Oil Price Increase, Latest News In Divya Marathi

इंधन दरवाढीविरुद्ध काँग्रेसने केले आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- भारतीय जनता पक्षाने ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ म्हणत सत्ता मिळवली. पण, महागाई आटोक्यात आणण्याऐवजी ती वाढवण्याचेच निर्णय घेतले. त्यामुळे या सरकारने लोकांचा भ्रमनिरास केल्याची टीका करत काँग्रेस पक्षाने रविवारी शहरात अनोखे आंदोलन केले. नेहमी फोरव्हीलर गाड्यांतून वावरणारे नेते टांगा, बैलगाड्यांत बसून आंदोलनात सहभागी झाले तर इतर नेते दुचाकी गाड्या ढकलत नेताना दिसले. पायी चालत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांची संख्याही मोठी होती.
पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसतर्फे रविवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून आंदोलनाला सुरुवात केली. शहराध्यक्ष यलगुलवार यांनी आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर तेथून इंधनावर चालणारी वाहने महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत (स्टेशन चौक) ढकलत नेली. काही पदाधिकारी बैलगाडीतून, काही टांग्यातून या अनोख्या रॅलीत सहभागी झाले होते. ही रॅली आंबेडकर पुतळ्यापासून, डफरीन चौक , महापौर निवास मार्गे रेल्वे स्टेशन चौकात पोहोचली. तेथे समारोप करण्यात आला.
समारोपावेळी यलगुलवार म्हणाले, ‘नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर येताच महागाईत वाढच झाली. उलट आता ‘बुरे दिन आनेवाले हैं’ असे चित्र दिसू लागले आहे. हा लोकांचा भ्रमनिरास आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.’काँग्रेसने केलेल्या या आंदोलनात शहर काँग्रेसचे पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, ब्लॉक काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सर्वांनी आपापली दुचाकी वाहने ढकलत नेली, त्यात महिलांचाही समावेश होता. आंदोलनात प्रदेश सचिव धर्मा भोसले, संजय हेमगड्डी, नगरसेवक देवेंद्र भंडारे, मधुकर आठवले, उदय चाकोते, विनोद गायकवाड, पैगंबर शेख, दत्तात्रय बंदपट्टे, प्रा. ज्योती वाघमारे, युवक अध्यक्ष अमोल शिंदे, सेवादलाचे अध्यक्ष अशोक कलशेट्टी, गणेश डोंगरे, माणिकसिंग मैनावाले, सिद्धाराम चाकोते, डॉ. साहेबराव गायकवाड, जाबीर अल्लोळी आदी प्रमुख सहभागी होते.
स्वत: चालवला टांगा
नेहमीच फोरव्हीलरमधून फिरणार्‍या नेत्यांनी गाड्या ढकलण्याऐवजी टांगा आणि बैलगाडीत बसून रॅलीत सहभाग नोंदवला. माजी महापौर आरिफ शेख यांनी स्वत:च टांगा चालवला. यलगुलवार, भोसले, अमोल शिंदे, हेमगड्डी आदी नेते बैलगाडीत होते. ज्योती वाघमारे, सुमन जाधव यांच्यासह कार्यकत्यांनी दुचाकी वाहने ढकलत नेली. कार्यकर्ते पायी चालत सहभागी झाले होते.