आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृध्‍द कलावंतांना मानधनासाठी कायम पायपिटीचा फेरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - समाजातील दुर्बल, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी शासनातर्फे अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांसाठी राबवली जाते. योजना चांगली असली तरी ती राबवताना अनेक अडचणी येत आहेत. सांस्कृतिक संचालनालयामार्फत ही योजना राबवणे अपेक्षित असताना समाजकल्याण खात्याकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे समाजकल्याण अधिकार्‍याकडून पुढाकार घेऊन योजना राबवण्यासाठी प्रयत्न होतात. पण, पंचायत समितीतील अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे प्रत्यक्ष मानधन मिळवण्यासाठी विलंब होत आहे.

तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सदाशिव हरिदास यांनी ही प्रक्रिया सुरू केली. नवीन समितीची स्थापना केली. एका वर्षासाठी 60 जणांची निवड होते. पण, सन 2013 या वर्षामधील मानधन पात्र कलावंतांच्या यादीत असमानता असल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या हस्तक्षेपामुळे यादी असमान झाल्याचे निवड समितीचे अध्यक्ष पटेल यांनी स्पष्ट केले.

सहा महिन्यांचे मानधन आले
सध्या सहा महिन्यांचे मानधन आले आहे. पण तीन महिन्यांचे मानधन अद्याप शासनाकडून हस्तांतरीत झाले नाही. मिळालेल्या मानधनाचे पैसे पंचायत समित्यांना जिल्हा परिषदेतर्फे वर्ग करण्यात आले. काहींनी वाटप प्रक्रिया सुरूकेली. पण, बहुतांश कलावंत अद्यापही वंचित आहेत.

कलेच्या संवर्धनासाठी उभे आयुष्य खर्च करणार्‍या कलाकारांना वृद्धापकाळात थोडी मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने त्यांना मानधन देण्याची योजना जाहीर केली. पण, लालफितीच्या कारभारामुळे वेळेवर मानधन मिळत नाही अन् मिळाल्यास पंचायत समिती कार्यालयातून तातडीने वाटप होत नाही. दर महिन्याला मानधन देण्याचा नियम आहे. पण, गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून अद्याप मानधन मिळाले नाही. प्रत्येकवेळी हयातीच्या दाखल्यांची सक्ती होत असल्याने हजार रुपड्यांसाठी वृद्ध कलाकारांना पायपीट करावी लागते.

नव्या निवडीला मंजुरीच नाही
दरवर्षी फक्त 60 जणांच्या निवडीचे बंधन आहे. 11 तालुक्यातून प्रत्येकी पाच जणांची निवड करतो. ज्या तालुक्यात जास्त प्रस्ताव तेथील दोन किंवा तीन जादा कलावंतांची निवड करतो. नव्या निवडीला अद्याप मंजुरी मिळाली नाही. आमची समिती निमशासकीय आहे. मानधनासाठीच्या प्रस्तावांची छाणनी करून निवड करतो. खोटे प्रस्ताव स्वीकारत नसल्यामुळे ते नाराज होऊन तक्रारी होतात. बाबूलाल पटेल, अध्यक्ष, निवड समिती

सहा महिने मानधन नाही
गेल्या सहा महिन्यांपासून आम्हाला मानधन मिळाले नाही. मानधनाच्या चौकशीसाठी आम्हाला तालुक्याच्या गावाला जावे लागते. एकट्याला लांब जाणे शक्य नसल्याने कुटुंबातील सदस्याला सोबत न्यावे लागते. त्यांची कामं थांबवून त्यांना घेऊन जावे लागते. आमचे पैसे आलेत, असे कळाले आहे. दादाभाई बाबालाल शेख, खंडाळी (ता. मंगळवेढा)

माहिती मिळत नाही
वृद्ध कलावांतांचे नियमित मानधन मिळत नाही. कधी मिळणार याची माहिती त्यांना नीट दिली जात नाही. 24 हजारांपेक्षा कमी उत्पन्न व हयातीच्या दाखल्याची सक्ती करण्यात येते. पण, त्यासाठी तलाठींच्या मागे लागावे लागते. राजाराम वाघमारे, मोहोळ

तत्कालीन पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या मोहोळ (117) व उत्तर सोलापूर (226 कलावंत) मतदारसंघातील सर्वांधिक वृद्धकलावंतांना मानधन मिळते. इतर तालुक्यांतील वर्षामध्ये हजारो प्रस्ताव पडून आहेत. ‘तळे राखील तो पाणी चाखील’. या म्हणीचा प्रत्यय योजनेबाबत आहे.

काय आहे योजना : साहित्य व कलेच्या क्षेत्रात मोलाची भर घालणार्‍या कलाकारांना याचा फायदा मिळतो. यासाठी 50 वर्षांवरील कलाकार पात्र ठरतात. तहसीलदार, टीसी किंवा शासकीय रुग्णालयांनी प्रमाणित केलेला वयाचा दाखला आवश्यक आहे. कलाकारांचे वार्षिक उत्पन्न 24 हजारांपेक्षा अधिक नसावे. सोलापूर जिल्ह्यात एका वर्षात 60 कलाकारांना मानधनासाठी निवड करण्याचा कोटा आहे.

‘अ’ श्रेणी तमाशा, शाहिरी, लोककला
‘ब’श्रेणी चित्रपट, नाट्य कलावंत
‘क’श्रेणी भजन व कीर्तनकार


निवड समितीवरून वाद
निवड समितीमध्ये कोण सदस्य असावेत यावरून कलावंतांमध्ये शीतयुद्ध आहे. शिवाय यादी तयार करताना दर्जेदार कलावंतांना डावलले जात असल्याचेही आरोप होतात. समितीमधील काही सदस्य नेत्यांचे सगे-सोयरे असल्यामुळे त्यांच्या निवडी झाल्याची चर्चा आहे. समितीमधील काही सदस्य त्यांच्याच क्षेत्रातील कलावंतांची जास्त निवड करण्यास प्राधान्य देत असल्याने निवड यादीत समानता नाही.

समितीकडे अधिकार
योजनेसाठी पात्र लाभार्थी कलाकार निवडण्याचे काम जिल्हास्तरीय निवड समिती करते. पालकमंत्र्यांच्या शिफारशीने या समितीची स्थापना होते. या 5 सदस्यीय समितीची मुदत 5 वर्षांसाठी असते. सध्या शाहीर बाबूलाल पटेल हे समितीचे अध्यक्ष आहेत. बाळासाहेब रामचंद्र काळे, केशरनानी ज्योती घाडगे, राजाराम शिवाजी वाघमारे, पुरुषोत्तम मारुती कसबे हे समितीचे सदस्य आहेत.