आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या नोटांना नाही सहकार, ‘एसबीआय’ एकच आधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जुन्या नोटा बदलून देण्याची सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांना दिली. परंतु स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)शिवाय त्याची कुणीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे.

जुन्या, जीर्ण झालेल्या नोटा बदलून देण्याबाबत अनास्था असल्याचे लक्षात आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने 28 जानेवारीला सुधारित परिपत्रक काढले. त्यात सर्व बँकांनी ही जबाबदारी घ्यावी, अशी सूचना केली. 2005 पूर्वीच्या सर्व नोटा बदलून द्याव्यात, असेही स्पष्ट केले. परंतु, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी आणि बाळीवेस शाखेत त्याचे स्वतंत्र कक्ष असल्याचे दिसून आले. सहकारी बँकांनी मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केले. इतर राष्ट्रीयीकृत बँकांमध्येही ही सुविधा उपलब्ध नाही.

एसबीआय अग्रेसर
स्टेट बँकेच्या शाखांमध्ये नोटा बदलून देण्याची प्रक्रिया वर्षभर चालत असते. ही जबाबदारी फक्त स्टेट बँकेचीच नाही. इतर बँकांचीही आहे. परंतु, त्याची दखल घेत नसल्याने स्टेट बँकेवरच त्याचा ताण पडतो. जुन्या, जीर्ण झालेल्या नोटा बदलून देणे ही बाब ग्राहक सेवेचाच एक भाग आहे.’’ अशोक शिंदे, व्यवस्थापक, रोकड, एसबीआय

जनता बँकेत सुविधा
सोलापूर जनता सहकारी बँकेच्या काही शाखांमध्ये नोटा बदलून देण्याचे काम होते. परंतु त्यासाठी स्वतंत्र कक्ष काही सुरू केलेले नाही. ग्राहकांकडील जुन्या नोटा स्वीकारतो. बदल्यात चांगल्या नोटा देतो. हे काम अधिक वाढवण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.’’ अरुण दुधाट, सरव्यवस्थापक, जनता बँक

हजाराच्या नोटा 5.9 टक्के
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार 31 मार्च 2013 अखेरीस देशात विविध मूल्यांच्या एकूण 7351 कोटी नोटा चलनात होत्या. त्यापैकी 14.6 टक्के नोटा पाचशेच्या तर 5.9 टक्के नोटा एक हजार रुपयांच्या आहेत.

धावपळीची गरज नाही
2005पूर्वी पाचशे आणि हजारच्या नोटा कमी प्रमाणात छापल्या गेल्या आहेत. तसेच 2005मध्ये पूर्वीच्या 14.1 अब्ज नोटा चलनाबाहेर काढलेल्या आहेत. जुन्या, खराब नोटा बँकेच्या खात्यातही जमा करता येतील. त्यामुळे ग्राहकांनी धावपळ करण्याची गरज नाही, असे अधिकार्‍यांचे मत आहे.

बदलायचे कशासाठी?
परदेशी पर्यटकांच्या हातात जुन्या नोटा जाऊ नयेत. नोटांवरच देशाची प्रतिमा, बळकट अर्थव्यवस्था दिसून येते. ती अधिक स्वच्छ राहावी, या हेतूने नोटा बदलायच्या असतात. छोट्या-मोठय़ा बँकांमार्फत अशा नोटा जमा झाल्या, की रिझर्व्ह बँकेकडे पाठवल्या जातात. बदल्यात करकरीत नोटा दिल्या जातात. ज्या एटीएम सुविधेत तांत्रिक अडचणी निर्माण करणार्‍या नसतात.

रिझर्व्ह बँक काय म्हणते?

  • जुन्या, जीर्ण झालेल्या आणि फाटक्या नोटा बदलून द्या
  • नोटा बदलून देण्यासाठी बँकेत स्वतंत्र कक्ष सुरू करा
  • येणार्‍या नोटांवर लक्ष ठेवा, त्या कशा फाटल्या पाहा
  • संशयित नोटा असतील तर त्याची अधिक चौकशी करा