आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा दिवसेंदिवस महागच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- राज्यातील कांदा उलाढालीत दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असली तरी दराचा आलेख चढताच आहे. ठोक बाजारात अंदाजे 40 रुपयांना किलो असणारा कृषीमाल ग्राहकांच्या हाती पडेपर्यंत त्याची किंमत जवळपास 30 रुपयांनी वाढलेली असते. या पार्श्वभूमीवर शहरी नागरिकांना दिलासा देण्यासाठी बाजार समिती स्वस्त भाजीपाला केंद्र सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे.

सध्या बाजारसमितीत 60 ते 70 ट्रक (टन) कांद्याची आवक होत आहे. परंतु केवळ सोलापुरातच नव्हे तर इतरत्रही कांद्याचे दर वाढले आहेत. एरवी 15 ते 20 रुपयांना किलो असणारा कांदा सध्या 50 रुपयांच्या खाली मिळत नाही. कमी आवकेचा हा परिणाम आहे. कांदा महाग होण्याचे मुख्य कारण अपुरे पर्जन्यमान आहे. शिवाय कांदा साठवून कृत्रिम टंचाईही निर्माण केली जात आहे. कांद्याची मुख्य बाजारपेठ असणारा नाशिक, लासलगाव येथेही कांदा तेजीच आहे. शहरातील काही मोठय़ा व्यापार्‍यांकडून आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी कांद्याची साठवण होत असल्याचा परिणामही दरावर होत असल्याचे बोलले जाते. अवैध साठवणुकीमुळे कांदा महाग झाला तरी त्याचा फायदा शेतकर्‍याला होण्याऐवजी दलाल आणि व्यापार्‍यांनाच अधिक होत असल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये आहे.

कमी पावसामुळेच वाढीव दर
यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडल्याने त्याचा परिणाम सर्वच कृषीमालांवर झाला आहे. परंतु कांद्यावर मुख्यत्वे तो जाणवत आहे. दिवाळीपर्यंत आवक वाढली तर दर कमी होतील, असा अंदाज आहे.’’ सादिक बागवान, सत्यम ट्रेडर्स, व्यापारी, बाजार समिती

भाजीपाला केंद्र सुरू करणार
बाजारसमितीत येणारा कृषीमाल नाशवंत असल्याने त्याची फार दिवस साठवणूक करता येत नाही. कांदा व इतर सर्वच भाजीपाल्यांचे वाढते दर पाहता बाजार समितीमार्फत यार्ड परिसर आणि शहरातील प्रमुख मंडयांमध्ये स्वस्त भाजीपाला केंद्र लवकरच सुरू करीत आहोत.’’ दिलीप माने, सभापती, बाजार समिती

पुढे काय?
माजी सभापती इंदुमती अलगोंडा पाटील यांनी भाजीपाला थेट विक्री केंद्र सुरू केले होते. यामुळे अडत्यांच्या मध्यस्थीविना शेतकरी थेट ग्राहकांना भाजीपाला विक्री करत होते. याच पार्श्वभूमीवर स्वस्त भाजीपाला केंद्र सुरू होणार आहे. यामुळे नागरिकांना स्वस्त दरात कृषीमाल खरेदी करता येणार असून शेतकर्‍यांनाही दिलासा देणारी ही योजना ठरणार आहे. शहराची गरज ध्यानात घेता ही योजना तुटपुंजी असली तरी मार्केट कमिटी छोटासा प्रयत्न करू पाहतेय.

शनिवारी बाजार समितीत कांद्याची आवक 842 क्विंटल झाली. प्रतिक्विंटल दर किमान 100 रुपये तर कमाल 4 हजार 500 होता. सर्वसाधारण दर 1 हजार 800 रुपये होता.