सोलापूर - आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज घेण्यास मंगळवारपासून सुरवात केली. पहिल्याच दिवशी शहर उत्तर मतदारसंघासाठी पाच जणांनी उमेदवारी अर्ज घेतले. शहरमध्यसाठी एकही इच्छुक आला नसून सोलापूर दक्षिणसाठी बंजारा समाजाचे अशोक चव्हाण यांनी अर्ज घेतला.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून प्रदेश पातळीवरील तेढ वाढतच आहे. राष्ट्रवादीला शह देण्याच्या उद्देशाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सर्व विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज व पक्षनिधी घेण्याची प्रक्रिया सुरू केली. राष्ट्रवादीबरोबर जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर इच्छुकांनी जमा केलेला पक्षनिधी परत देण्याचे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले. सर्वसाधारण वर्गासाठी पाच हजार, महिला व मागासवर्गीय उमेदवारासाठी अडीच हजार रुपये पक्षनिधी आहे. विद्यमान आमदारांना त्याच मतदारसंघासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे.
काँग्रेसभवनमध्ये 11 ऑगस्टपर्यंत अर्जाची विक्री करण्यात येईल. इच्छुकांना टपाल, कुरिअर, ई-मेल किंवा फॅक्सद्वारे प्रदेश काँग्रेस कमिटीकडे अर्ज पाठविता येईल. मंगळवारी (दि.5) पहिल्याच दिवशी ‘248 शहर उत्तर विधानसभा’ मतदारसंघासाठी माजी शहराध्यक्ष व प्रदेश सचिव धर्मा भोसले, माजी नगरसेवक सिद्धाराम चाकोते, शिक्षण समितीचे माजी सभापती सुनील रसाळे, गंगाधर गुमटे, राजन कामत यांनी अर्ज घेतले. कामत यांनी काल श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर अर्ज घेऊन, पाच हजार रुपये पक्षनिधीही जमा केला. आमदार प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्य साठी कुणीही अर्ज घेतला नाही. पण, ‘दक्षिण’साठी अशोक चव्हाण यांनी अर्ज घेतला.