आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसांपासून 12 पैकी केवळ तीनच सिग्नल चालू !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आसरा, महावीर चौक, गांधीनगर, पत्रकार भवन, सिव्हिल चौक, शांती चौक, आम्रपाली चौक, संत तुकाराम चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक येथील वाहतूक सिग्नल मागील तीन दिवसांपासून ( शुक्रवार ते रविवार) बंद स्थितीत आहेत. डफरीन, सरस्वती व रंगभवन या तीनच चौकांत सिग्नल सुरू होते. याबाबत पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के यांना रविवारी विचारले असता, माहिती घेऊन आढावा घेतो आणि सिग्नल चालू ठेवण्यासाठी पोलिसांना सूचना देतो, असे सांगितले.

महपालिकेतर्फे बीओटी तत्त्वावर तेरा चौकांत सिग्नल उभारणीचे काम हाती घेण्यात आले. या घटनेला आता सव्वावर्ष लोटले. ‘दिव्य मराठी’मागील 19 जानेवारीपासून सिग्नल सुरू करण्यासाठी पाठपुरावा करत आहे. त्यानंतर तेरापैकी सध्या बारा सिग्नल चालू आहेत. जुना बोरामणी नाका येथील सिग्नल अद्याप कार्यान्वित झालेलाच नाही.

काय ठरले होते ?
2 मार्च 2013 रोजी तत्कालीन पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे, तत्कालीन महापलिका आयुक्त अजय सावरीकर, पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांची शासकीय विश्रामगृहात बैठक झाली होती. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी शहरातील तीन आमदारांकडून प्रत्येकी 15 लाख, डीपीसी योजनेतून 50 लाख आणि महापालिकेकडून 25 लाख असा सुमारे सव्वा कोटीचा निधी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेकडून जिल्हा नियोजन समितीला प्रस्ताव देण्यात आला आहे. त्याचा समावेश मागील बैठकीत झालाच नाही. आगामी काळात होणार्‍या नियोजन समिती बैठकीत याबाबत चर्चा व्हावी.

वारंवार बंद का पडतात सिग्नल?
डफरीन व सरस्वती हे दोन चौक सोडल्यास अन्य नऊ चौकांतील सिग्नल कधी बंद, तर कधी चालू असतात. पोलिसांकडे चौकशी केल्यानंतर वायरच शॉर्ट झालीय, एकदाच सगळे दिवे लागतात असे सांगण्यात येते. वायरिंग खराब असेल अथवा दिवे खराब असतील तर बदलण्यात का येत नाहीत? दोन चौकांत (डफरीन व सरस्वती) सोडल्यास अन्य दहा चौकांत टायमरच नाही. अनेक सिग्नलसमोर झाडाच्या फांद्या आल्या आहेत, अतिक्रमण आहे. अँपेरिक्षा, रिक्षा सिग्नल चौकातच कोपर्‍यावर थांबतात. चुकीच्या दिशेने वाहनधारक येतात.

निधी देण्याची माझी तयारी
सिग्नल, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) योजनेतून काही निधी आणता येईल का, याबाबत मी अभ्यास करून प्रस्ताव देणार आहे. नव्याने दोनशे सीटीबस येणार आहेत. त्यासाठी चांगले रस्ते, सिग्नल चौक, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. सिग्नलसाठी आमदार फंडातून माझी निधी देण्याची तयारी आहे. ’’ प्रणिती शिंदे, आमदार

16 सिग्नलचा प्रस्ताव गायब?
तेरा चौकांशिवाय अन्य सोळा चौकांत सिग्नल बसवण्याचा प्रस्ताव महापालिकेला वाहतूक शाखेने पाच महिन्यांपूर्वीच दिला आहे. त्याबाबत अद्याप काहीच अंमलबजावणी झाली नाही. बारा सिग्नल सध्या चालू आहेत. ते वारंवार का बंद पडतात. महापालिकेने वाहतूक शाखेला ही यंत्रणा हँडओहर (ताबा) केलेली नाही. सध्या बारा सिग्नल चालू आणि तेराव्या चौकात काम सुरू आहे,. तेरा सिग्नल सक्षमपणे चालणे गरजेचे आहे.